‘मफतलाल इंडस्ट्रीज’ची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय परिसरालगत असलेल्या २७ हजार २८४.३६ चौरस मीटर आकाराच्या भूखंडाबाबत पुन्हा एकदा मफतलाल इंडस्ट्रीजच्या विरोधात निकाल लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये राणीबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उद्यनाच्या विकासातील शेवटचा अडथळाही दूर झाला आहे.

मुंबई महापालिकेकडे भूभाग हस्तांतरित करण्याविरोधात मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडने उच्च न्यायालयात केलेली विनंती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानेही या विरोधातील कंपनीची याचिका फेटाळली. त्यामुळे आता विस्तारित राणीबागेच्या विकासातील सर्व अडथळे दूर झाले आहेत.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयालगत (राणीचा बाग) सुमारे ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटर आकाराचा भूखंड आहे. माझगाव विभागातील ‘सीएस ५९३’ क्रमांकाचा हा भूखंड मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडला भाडेपट्टय़ाने देण्यात आला होता. याबाबत महाराष्ट्र शासनाने २००४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे या भाडेपट्टय़ाचा कालावधी २०१७ मध्ये संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या भूखंडाचा निम्मा म्हणजेच २७ हजार २८४.३६ चौरस मीटर भूभाग महापालिकेकडे वर्ग करणे आवश्यक होते.

महापालिकेकडे भूभाग हस्तांतरित करण्याविरोधात मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका ऑगस्ट २०१८ मध्ये फेटाळली. त्यामुळे कंपनीने सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयाने निकाल दिला. उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत ती याचिका फेटाळून लावण्यात आली. याबाबत सर्वोच्च न्यायालयात महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ शेखर नाफडे आणि श्याम दिवाण यांनी बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महापालिकेच्या उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारास आता अधिक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडकडील : भूखंड ५४ हजार ५६८.७२ चौरस मीटर

महापालिकेकडे वर्ग होणारा भूखंड : २७ हजार २८४.३६ चौरस मीटर