आठ फेऱ्यांनंतरही अकरावीला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला असून जवळपास तीनशे विद्यार्थ्यांचे प्रवेश शेवटच्या टप्प्यांत निश्चित झाले आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रिया अखेर संपली असून शेवटच्या टप्प्यांत साधारण ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. नियमित फेऱ्या, विशेष फेऱ्या, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील फेऱ्या अशा जवळपास आठ प्रवेश फेऱ्या झाल्यानंतरही हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. या विद्यार्थ्यांना १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली होती.

पहिले सत्र संपल्यानंतरही प्रवेश न मिळाल्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी १२५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. या फेरीसाठी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच अकरावी प्रवेशाचा अर्ज भरला. विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले असले तरी आता कनिष्ठ महाविद्यालयांच्या पहिल्या सत्र परीक्षाही झाल्या आहेत. सप्टेंबरअखेर आणि ऑक्टोबरमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे विज्ञान शाखेला प्रवेश घेतलेलेही आहेत. त्यामुळे पुढील एका सत्रात पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम, परीक्षा, प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना भरून काढावी लागणार आहेत.