मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावरील मंकि हिल ते नागनाथदरम्यान सुरू असलेले तिसऱ्या मार्गिकेचे दुरुस्तीकाम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे १५ जानेवारी २०२० या मुदतीआधी ही मार्गिका खुली करण्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.

यंदा पावसामुळे मुंबई ते पुणे मार्गावर काही ठिकाणी मोठा फटका बसला. मंकी हिल ते नागनाथदरम्यान रूळ उखडण्याबरोबरच रुळाखालील खडी वाहून जाणे, सिग्नल बिघाडासह अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणारा तिसरा मार्ग बंद करावा लागला. परिणामी रेल्वेसेवा पूर्णत कोलमडून गेली.

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावरील अन्य भागांतील दुरुस्ती केल्यानंतर लांबलेल्या पावासामुळे ६ नोव्हेंबरपासून मंकी हिल ते नागनाथदरम्यानच्या कामाला हळूहळू सुरुवात करण्यात आली. कामाला विलंब झाल्याने १५ जानेवारी २०२० नंतरच तिसरी मार्गिका सुरू होण्याची शक्यता मध्य रेल्वेने वर्तवली होती. परंतु या पट्टय़ातील कामाला दिलेल्या गतीमुळे काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. मंकी हिल ते नागनाथ पट्टय़ात असलेल्या पुलाच्या कामासाठी तेथे गर्डर घेऊन जाणे रेल्वेसमोर आव्हान होते. गर्डर बसवण्याचे महत्त्वाचे काम मार्गी लागल्याने आता नवीन रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर यांसह अन्य काही तांत्रिक कामे शिल्लक असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. ही कामे पूर्ण होताच त्या भागातून इंजिनाची चाचणी घेऊन रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर मार्ग पूर्ववत केला जाईल. कामाचा वेग पाहता १५ जानेवारी आधीच मुंबई ते पुणे तिसरा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

वेळापत्रक विस्कळीत

या तिसऱ्या अप मार्गिकेवरून दररोज ३० मेल-एक्स्प्रेस धावतात. मात्र दुरुस्तीकामामुळे या गाडय़ा अन्य दोन मार्गिकांवरून वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गिकांवरील ताण वाढला असून वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.