ज्येष्ठ समाजवादी नेते प्रभूभाई संघवी यांचे अल्पशा आजाराने दादर येथे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. १९५१ -६५ या कालावधीत संघवी यांनी राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे ते मानसपुत्र मानले जात. वरळी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी उषा मेहता, वसंत नाचणे, डॉ. एम. आर. कामत, यशवंत क्षीरसागर, अपना परिवार प्रमुख सुरेश जागुष्टे, जी.जी.पारेख, नवनीतभाई शहा, भास्कर सावंत, शिवाजी धुरी आदी मान्यवर उपस्थित होते. समर्थ शिक्षा मंडळ व चॅरिटी ट्रस्ट, डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्ट, पंचायत भारती या संस्थांचे ते विश्वस्त होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात व त्यानंतरही अनेक वर्षे संघवी यांनी एस. एम. जोशी यांचे साहाय्यक म्हणून काम केले होते. समाजवादी चळवळीतील सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ‘ध्येयधुंद सोबती’ नावाचे पुस्तक लिहिले होते. त्यांच्या निधनाच्या दिवशीच या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन होणार होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 4:28 am