गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. लता मंगेशकर यांना ११ नोव्हेंबरपासून मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.  लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. निमोनिया आणि श्वसनाचा त्रास या दोन कारणांमुळे त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जागतिक किर्ती लाभलेले आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. फारुख उद्वारिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार केले जात आहेत. ११ नोव्हेंबरपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन १३ नोव्हेंबरपासूनच केलं जातं आहे. तसंच गेल्या सोमवारीही लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती दिली.

आज पीटीआय या वृत्तसंस्थेने लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारत असल्याचं वृत्त दिलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त देण्यात आलं आहे. सुरुवातीचे काही दिवस लता मंगेशकर यांना लिक्विड डाएटवर ठेवण्यात आलं होतं. मात्र मागच्या सोमवारपासून त्यांना हलका आहार देण्यात येतो आहे असंही समजतं आहे.