परीक्षेपूर्वीच्या दोन दिवसांत ७०० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

आदल्या दिवशीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा मिळायला लागल्यापासून बारावीचे ‘लेटलतिफ’ वाढू लागले आहेत. मुंबईत तर शेकडोच्या संख्येने विद्यार्थी या सवलतीचा फायदा घेत असून यंदा तब्बल ७०० विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच्या दोन दिवसांत अर्ज भरले होते. त्यासाठी चार ते पाच हजार रुपयांपर्यंतचा विलंब शुल्काचा भरुदडही सहन करण्यास विद्यार्थी तयार आहेत. या सवलतीचा फायदा अडल्यानडल्या विद्यार्थ्यांना होत असला तरी त्यामुळे विद्यार्थ्यांची पात्रता नीट तपासली जात नसल्याने त्याचा गैरफायदा बोगस परीक्षार्थी घेऊ शकतात, असा इशारा शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे.

बारावीतील एकही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये म्हणून तीन वर्षांपूर्वी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज स्वीकारण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला. परंतु महिना-दोन महिने संधी देऊनही शेकडो विद्यार्थी आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. आयत्या वेळी अर्ज भरणाऱ्या या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर सोय करताना मंडळाच्या मात्र नाकीनऊ येते आहे. दुसरीकडे इतक्या कमी वेळेत या विद्यार्थ्यांच्या पात्रतेबाबत तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे त्याचा गैरफायदा बोगस परीक्षार्थी घेण्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे.

बारावीची परीक्षा मंगळवारपासून (२८ फेब्रुवारी) सुरू झाली; परंतु परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे २५ फेब्रुवारीला मुंबई विभागातून तब्बल ६२२ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले. त्यानंतर सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वाशी येथील विभागीय कार्यालय सुरू झाल्यानंतर आणखी ५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले. इतकेच नव्हे तर परीक्षेच्या दिवशी पेपर सुरू झाल्यानंतरही एका विद्यार्थ्यांने अर्ज भरून परीक्षेला बसण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यालाही विलंब शुल्क भरून परीक्षेला बसू देण्यात आले, अशी माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. त्याची बाजूच्याच केंद्रावर परीक्षा देण्याची सोय करण्यात आली. हा विद्यार्थी अर्धा तास उशिरा केंद्रावर पोहोचला; परंतु त्याने परीक्षा दिली.

परीक्षेच्या तयारीबाबत साशंक असलेले किंवा काही अपरिहार्य कारणामुळे अर्ज भरू न शकलेले अशा विद्यार्थ्यांची या सवलतीमुळे सोय होते हे खरे आहे; परंतु अनेकदा गरज नसतानाही विद्यार्थी मुदत संपली तरी अर्ज भरण्याचे टाळतात. यासंबंधी मुंबई विभागीय मंडळाच्या माजी अध्यक्ष बसंती रॉय यांनी धोक्याची सूचना दिली. ‘या सवलतीचा गैरफायदा बोगस परीक्षार्थी बसविण्याकरिता होऊ शकतो. कारण इतक्या कमी वेळेत विद्यार्थ्यांची पात्रता तपासणे मंडळाला शक्य होत नाही. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीतच विद्यार्थ्यांचे अर्ज आदल्या दिवशीपर्यंत स्वीकारले जावेत,’ अशी सूचना त्यांनी केली.

बनवेगिरीची भीती

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा देण्यासाठीची पात्रता पुढील काही गोष्टींवर ठरते. यात प्रत्येक सत्रात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन, प्रात्यक्षिक परीक्षा झाल्या आहेत का हेही तपासावे लागते. तसेच शाळेतर्फे बसत असल्यास शाळा मान्यताप्राप्त आहे का, हेही पाहावे लागते; परंतु इतक्या कमी वेळेत हे तपासणे मंडळाला शक्य होत नाही.

विलंब शुल्काचा भरुदड

बारावीकरिता दिलेल्या मुदतीत अर्ज भरला तर ३५० रुपये इतके परीक्षा शुल्क आहे; परंतु मुदत संपल्यानंतर विलंब आणि अतिविलंब शुल्काची रक्कम दिवसागणिक ५० ते १०० रुपयांनी वाढत जाते. आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे विलंब शुल्क पाच हजारांवर जाते.

५६ विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले

मुंबईतील एका रात्र महाविद्यालयातील ५६ विद्यार्थ्यांना या सवलतीचा मात्र चांगलाच फायदा झाला. या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतले. मात्र महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याने ते मंडळाकडे भरलेच नाहीत. परीक्षा तोंडावर आली तरी प्रवेशपत्र न मिळाल्याने महाविद्यालयाने मंडळाशी संपर्क साधला. तेव्हा अर्जच जमा न झाल्याचे लक्षात आले. या विद्यार्थ्यांचे अर्ज मंडळाने सोमवारी दाखल करून घेतले आणि त्यांना परीक्षेला बसण्याची मुभा दिली. अर्थात या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विलंब शुल्कापोटीचा चार ते पाच हजार रुपयांचा भरुदड कुणी सहन केला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.