29 November 2020

News Flash

लातूरमध्ये शिक्षक बनले भारवाही..

जिल्हाधिकारी कार्यालयातील गठ्ठे टेम्पोत भरण्याचे काम

(संग्रहित छायाचित्र)

अध्यापनाव्यतिरिक्त इतर सर्व कामांत गुंतलेल्या शिक्षकांना आता जिल्हाधिकारी कार्यालयाची आवराआवर करण्याचे कामही प्रशासनाने सोपवले आहे. करोना काळात ऑनलाइन अध्यापन, सर्वेक्षणे, नाकाबंदी अशी पडतील ती कामे शिक्षकांना करावी लागली आहेत. त्यात आता या नव्या कामाची भर पडली आहे.

अशैक्षणिक कामे हा राज्यात नेहेमीच वादग्रस्त ठरलेला मुद्दा आहे. उघडय़ावर शौचास बसणाऱ्या नागरिकांचे टमरेल जप्त करण्यापासून ते पोषण आहाराच्या धान्याच्या पोत्यांचे हिशोब ठेवण्यापर्यंत कोणत्याही कामांसाठी शिक्षकांना वेठीस धरण्यात आले. लागोपाठ आलेल्या निवडणुकांमध्ये शिक्षकच शाळाबा झाले. करोना काळातही रुग्णांचे सर्वेक्षण, नाकाबंदी, विलगीकरण कक्षातील काम शिक्षकांवर सोपवण्यात आले.

या क्रमवारीत आता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने हद्द पार केली आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने कागदपत्रांच्या बस्त्यांवरील (कागदपत्रांचे गठ्ठे) धूळ झटकणे, नव्या कार्यालयात त्यांचे स्थलांतर करण्यासाठी टेम्पोत गठ्ठे भरणे, अशी कामे शिक्षकांवर लादली आहेत, अशी शिक्षकांची तक्रार आहे.

काय झाले ?

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. मात्र तेथील अभिलेख कक्ष जुन्या इमारतीत आहे. जुन्या कार्यालयातील बस्ते नवीन कार्यालयात स्थलांतरित करायचे आहेत. त्यासाठी बस्त्यांवरील धूळ झटकणे, त्यांचे वर्गीकरण करणे, टेम्पोमध्ये बस्ते भरणे, नव्या कार्यालयात उतरवून घेणे अशी कामे आहेत. ही कामे प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्यात आली आहेत. साधारण ४० शिक्षकांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे.

शिक्षक संघटनेकडून निषेध

‘महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदे’ने या प्रकाराचा निषेध केला आहे. ‘जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश हे शिक्षकांना अशैक्षणिक काम लावणारे आहेतच. त्याचबरोबर कामाचे स्वरूप पाहता हा शिक्षकांचा अपमान आहे,’ असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.

शिक्षक कचाटय़ात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षक हे शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कचाटय़ात सापडले आहेत. या दोन्ही यंत्रणांचे आदेश शिक्षकांना पाळावे लागतात. ऑनलाइन अध्यापनाचा आठवडय़ाचा आढावा देण्याचे आदेश शिक्षण विभागाने पूर्वीच दिले आहेत, तर स्थानिक प्रशासन इतर कामे लादते, असे एका शिक्षकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:44 am

Web Title: latur task of filling the bundle tempo for the teachers in the collectorate abn 97
Next Stories
1 टीआरपी घोटाळा: रिपब्लिक वाहिनीच्या पाच गुंतवणूकदारांना समन्स
2 ‘ब्लू मून’ पर्वणी शनिवारी
3 करोना चाचणी आता ९८० रुपयांत