परदेशात असतात तशी सार्वजनिक ठिकाणी मशीनमध्ये कपडे धुण्याची सोय पालिकेने अंधेरीमध्ये उपलब्ध करून दिली आहे. पालिकेने खासगी कंपन्यांच्या सहकार्याने अंधेरीत अनोखा प्रयोग केला आहे. सुविधा या नावाने दुमजली केंद्र सुरू केले असून त्यात आंघोळ आणि शौचालयाचीही सुविधा देण्यात आली आहे.

या केंद्रात येऊन लोकांना कपडे धुण्याच्या मशीनमध्ये आपले कपडे धुऊन, सुकवून नेता येणार आहे. अवघ्या ५५ रुपयांत एक बादली म्हणजेच साधारण १२ कपडे धुण्याची सोय, १ रुपयात एक लिटर पिण्याचे पाणी, कमोडची सोय, आंघोळीची सोय अशा सुविधा या केंद्रात देण्यात आल्या आहेत.

धुण्याचे कपडे घेऊन जायचे आणि सार्वजनिक मशीनमध्ये स्वतच धुऊन सुकवून आणायचे, अशी सुविधा मुंबईतही उपलब्ध झाली आहे. पालिकेच्या के (पूर्व) विभागाने अंधेरी पूर्वेला आंबेवाडीत असे अनोखे सुविधा केंद्र सुरू केले आहे. अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या स्वच्छतेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

सुविधा केंद्रात काय ?

या सुविधा केंद्रात बेसीनची सोय, साबण, आंघोळीसाठी दोन शॉवरसहित न्हाणी घरे, ४० शौचालये त्यापैकी १८ महिलांसाठी तर १८ पुरुषांसाठी, लहान मुलांसाठी तीन व अपंगासाठी एक शौचालय अशी सोय आहे. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन बदलण्याची सोय आहे. तसेच पिण्याच्या शुद्ध पाण्याचा २४ तास पुरवठा करणारे मशीनही यात असून १ रुपयात एक लिटर पाणी तर १५ रुपयात २० लीटर पाणी मिळू शकणार आहे. तर कपडे धुण्याच्या आठ मशीन येथे आहेत. बादली, साबण पावडर याचाही पुरवठा इथे केला जातो. ५५ रुपयात एक बादली म्हणजेच साधारण बारा कपडे धुता येतात. हात धुण्यासाठी, दात घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी इथे शौचालयासाठी वापरले जाते.

हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड आणि एचएसबीसी बॅंक यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम सुरू करण्यात आला  आहे. या केंद्रातील सांडपाण्यावर तिथेच पुन:प्रक्रिया करून ते पाणी शौचालयांसाठी वापरले जाते. २४ तास असलेली सुविधा पंधरा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली असून सध्या २५० कुटुंबे या सुविधेचा वापर करीत आहेत.

– प्रशांत सपकाळे, साहाय्यक आयुक्त