‘कालनिर्णया’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांच्या निधनाचे वृत्त सर्वत्र पसरले आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. विविध क्षेत्रातील दिग्गज, राजकारणी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी माटुंग्यातील त्यांच्या ‘लक्ष्मी सदन’ निवासस्थानी धाव घेऊन ज्योतिर्भास्करांचे अंत्यदर्शन घेतले.
हिंदुजा रुग्णालयात पहाटे निधन झालेल्या जयंतराव साळगावकर यांचे पार्थिव सकाळी नऊ वाजता लक्ष्मी सदनमध्ये आणण्यात आले. नेहमी सल्ला घेण्यासाठी येणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची पितृस्थानी असलेल्या जयंतरावांच्या अंत्यदर्शनासाठी ‘लक्ष्मी सदन’मध्ये रीघ लागली. उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री पतंगराव कदम, राज्यमंत्री सचिन अहिर, उद्योगमंत्री नारायण राणे, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, गणेश नाईक, रिपाई अध्यक्ष रामदास आठवले, सुरेश प्रभू, महापौर सुनील प्रभू, शिशिर शिंदे, भाजपचे विनोद तावडे, आशीष शेलार, बाळा नांदगावकर, अमित देशमुख, केसरी पाटील, माजी आयुक्त शरद काळे, प्रसिद्ध कीर्तनकार महादेवबुवा शाबागकर, अशोक पत्की, ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर, भारतकुमार राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साळगांवकर यांचे अंत्यदर्शन घेतले. आधारवड हरपल्यामुळे दु:खात बुडालेल्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सकाळीच ‘लक्ष्मी सदन’वर धाव घेतली.
एरवी नेते मंडळी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमुळे गजबजून जाणारे ‘लक्ष्मी सदन’ आज उदास बनले होते. जगाचा अखेरचा निरोप घेतलेल्या जयंतरावांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. प्रत्येक जण फुले अर्पण करुन ज्योतिर्भास्करांचे आदरांजली अर्पण करत होते. काही कीर्तनकारांनी भजन आणि प्रार्थना करून जयंतरावांना श्रद्धांजली वाहिली. दुपार सरली आणि ‘लक्ष्मी सदन’बाहेर गर्दी वाढू लागली. साडेतीनच्या सुमारास फुलांनी सजविलेला ट्रक आला आणि अनेकांना अश्रू अनावर झाले. जयंतरावांच्या आठवणींना उजाळा देत अनेक जण हुंदके देत होते. दुपारी चारच्या सुमारास ज्योतिर्भास्करांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या ट्रकवर ठेवण्यात आले आणि अंत्ययात्रा शिवाजी पार्कमधील भागोजी कीर स्मशानभूमीच्या दिशेने निघाली. राजकीय नेते, सामाजिक, शैक्षणिक, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. जयंतरावांनी दिलेला सल्ला, कधी प्रेमाने पाठीवर मारलेली शाबासकीची थाप, तर कधी लटक्या रागाने तंबी या सर्व गोष्टींना अनेक जण उजाळा देत होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अंत्ययात्रा भागोजी कीर स्मशानभूमीत पोहोचली त्यावेळी वातावरण अधिकच शोकाकूल झाले. सायंकाळी ५.५५ च्या सुमारास त्यांच्या पार्थिवास मंत्राग्नी देण्यात आला आणि दादर परिसरातील असंख्य नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.