भाजपच्या प्रभाकर शिंदेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणारी भाजपचे नगरसेवक आणि पालिकेतील पक्षनेते प्रभाकर शिंदे यांची याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. त्यामुळे काँग्रेसचे रवी राजा हेच पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी कायम राहणार आहेत.

आपली नियुक्ती न करण्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत शिंदे यांनी त्याविरोधात याचिका केली होती. योग्य त्या पक्षाच्या पक्षनेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यास नकार देऊन महापौर पालिकेला प्रभावहीन करत असल्याचा आरोप शिंदे यांनी याचिकेत केला होता. त्यावर विरोधी पक्षनेतेपदासारख्या महत्त्वाच्या पदावरील नियुक्ती व्यक्ती किंवा राजकीय पक्षांच्या इच्छेनुसार केली जाऊ शकत नाही. कायदाही असे महत्त्वाचे पद कोणत्याही व्यक्ती वा राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार तात्पुरत्या स्वरूपावर भरण्याची परवानगी देत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने शिंदे यांची याचिका फेटाळताना नोंदवले.

न्यायालय म्हणते

’ सुरुवातीला भाजप विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही नव्हता; परंतु राजकीय समीकरणे बदलल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करण्यात आली, असा दावा शिंदे यांनी केला होता. मात्र तीन वर्षांपूर्वी पद धुडकावणारा पक्ष तीन वर्षांनंतर केवळ मनबदल झाल्याचे सांगत त्याची मागणी करू शकत नाही.

’  मुंबई महापालिका कायद्याचा दाखला देत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाच्या नेत्यालाच विरोधी पक्षनेतेपद दिले पाहिजे, हा शिंदे यांचा दावाही न्यायालयाने अमान्य केला. कायद्यातील ३७१ (ए) ही तरतूद बदल मान्य करत असली तरी हा बदल तात्पुरता असल्याचे कुठेही म्हणत नाही.

’  नंतर कायदेशीर किं वा सभागृहातील पक्षीय बलाबल बदलले तरी त्यानुसार आधी नाकारण्यात आलेल्या पदाबाबत बदल अपेक्षित नाही. कलम ३७१(ए)लाही तो अपेक्षित नाही. त्याला मान्यता दिल्यास विरोधी पक्षनेतेपद पक्षाच्या मतबदलानुसार सतत बदलत राहील.

वाद नेमका काय होता?

पालिकेत भाजप दुसऱ्या, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. तरीही महापौरांनी भाजपऐवजी काँग्रेसच्या नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. २०१७च्या निवडणुकांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपने सत्ताधारी शिवसेनेसोबत (त्या वेळी राज्यात मात्र सेना-भाजप युतीचे राज्य होते) जाण्याऐवजी तटस्थ राहण्याचा आणि विरोधी पक्षनेतेपद न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजा यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यामुळे फेब्रुवारीत भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी शिंदे यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्याची विनंती महापौरांना के ली. पालिकेत शिवसेनेच्या ८४, भाजपच्या ८३, काँग्रेसच्या ३१, तर राष्ट्रवादी पक्षाच्या नऊ जागा आहेत; परंतु पेडणेकर यांनी लोढा यांची विनंती फेटाळली. त्यामुळे शिंदे यांनी याचिका केली.