विविध ११ मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एमफुक्टो या राज्यातील प्राध्यापकांच्या संघटनेने संप पुकारला आहे. मात्र आता प्राध्यापकांचे मार्च महिन्याचे वेतन सरकारने रोखले असल्याने हळूहळू संपाचा प्रभाव कमी होत असून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक इत्यादी ठिकाणच्या काही प्राध्यापकांनी संपातून माघार घेत असल्याचे पत्र शिक्षण विभागाच्या संचालकांना अथवा उपसंचालकांना देण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे परीक्षेच्या कामात सहभागी होण्याचे आश्वासनही प्राध्यापकांकडून दिले जात आहे, अशी चर्चा केली जात आहे.
माघार घेणाऱ्या प्राध्यापकांची सर्वाधिक संख्या जळगावमध्ये आहे. तर धुळे-शिरपूर येथील विद्यावर्धिनी या महाविद्यालयातील सर्वच्या सर्व प्राध्यापकांना संपातून माघार घेतली आहे. नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालयातील ३० तर नाशिकच्या एसएमआरके महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी संपातून माघार घेतली
आहे.
मार्चचे वेतन रोखले गेले हे एक महत्त्वाचे कारण असून त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे  ३० एप्रिलला शैक्षणिक वर्ष संपत असून नंतर सुट्टीचा कालावधी सुरू होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत पत्रे दिली नाहीत तर कदाचित सरकार एप्रिल-मे चे वेतनही रोखेल अशी भीती प्राध्यापकांना वाटत आहे. तिसरे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे नेटसेटधारकांचा जो प्रश्न आहे त्याच्याशी फक्त ५ टक्के प्राध्यापकांचाच संबंध आहे. त्यामुळेच विविध ठिकाणच्या प्राध्यापकांकडून संपातून माघार घेत असल्याची पत्रे शिक्षण विभागाला दिली जात आहेत. मात्र, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर या ठिकाणच्या प्राध्यापकांनी संपातून माघार घेतलेली नाही, असा दावा एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केला आहे.
याबाबत बुक्टू संघटनेचे सरचिटणीस मधु परांजपे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, मुंबईत कोणत्याही शिक्षकांनी संपातून माघार घेतलेली नाही.
वेतन थकबाकीसाठी सरकारने १५०० कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपये थकबाकी देण्याचे ठरविले असून संपातून माघार घेणाऱ्या प्राध्यापकांनाच थकबाकी दिली जाणार आहे, अशी शिक्षण विभागाच्या संचालकांच्या कार्यालयातून महाविद्यलयांना पाठविली जात आहेत, असे समजते.