सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा

‘एशियाटिक’मधील गळती झालेल्या भागात गळतीबाबतची कोणतीही कामे गेल्या सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलेली नाहीत. गळती होत असलेल्या भागातील कामे ही आठ वर्षांपूर्वी करण्यात आली आहेत, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आला आहे.

‘लोकसत्ता’ दैनिकात ३१ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘एशियाटिक ग्रंथालयाच्या नूतनीकरणावर पाणी’ या बातमीसंदर्भात हा दावा करण्यात आला आहे.

२०१५ मध्ये एशियाटिक सोसायटी कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागास पूर्वसूचना न देता कौलारू छपराचे नूतनीकरणाचे काम परस्पर स्वतंत्रपणे ठेकेदाराकडून  करून घेण्यात आले आहे. त्यामुळे लगतच्या छपराच्या भागामधून आजमितीस गळती होत असल्याचे निदर्शनास येत आहे. टप्पा-२ अंतर्गत कामांमध्ये गळती होत असलेल्या कौलारू भागाचा समावेश नाही. मात्र ३० ऑगस्ट रोजी गळती झालेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असल्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.

दरम्यान ज्या भागातील पुस्तके भिजली आहेत त्या भागातील गळती, छतातून आणि भिंतीतून आलेली ओल याच्या दुरुस्तीशी ‘एशियाटिक’चा काहीही संबंध नाही. २०१५ मधील कौलारू छताच्या दुरुस्तीसंदर्भात ‘एशियाटिक’ने आपले म्हणणे यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले असल्याची माहिती ‘एशियाटिक’च्या सूत्रांकडून देण्यात आली.