अभ्यासक्रम अद्ययावत; फ्रेंच, जर्मन, रशियन, जपानी हे पर्यायही कायम

जगातील कठीण भाषांच्या यादीत मोडणारी चिनी भाषा आणि जगभरातील २१ देशांची भाषा असलेली स्पॅनिश भाषा शिकण्याची संधी आता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. राज्य मंडळाच्या अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमात या भाषांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम यंदापासून अद्ययावत करण्यात आला आहे. यंदा अकरावीच्या स्तरावर तर पुढील वर्षी बारावीच्या स्तरावर अभ्यासक्रम बदलणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर परदेशी भाषेचा पर्यायी विषय म्हणून अभ्यास करण्याची मुभा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळते. फ्रेंच, जर्मन, रशियन, जपानी या भाषांचे पर्याय आतापर्यंत उपलब्ध होते. त्याला विद्यार्थ्यांकडून प्रतिसादही मोठय़ा प्रमाणावर मिळत होता. बारावीच्या परीक्षेला फ्रेंच आणि जर्मन भाषा दरवर्षी ३ ते ५ हजार विद्यार्थी घेतात, तर रशियन आणि जपानी भाषा ७० ते १०० विद्यार्थी घेतात. आता या जोडीला आणखी दोन नव्या भाषा शिकवण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. स्पॅनिश आणि चिनी या भाषाही अकरावी आणि बारावीच्या स्तरावर अभ्यासता येतील. त्यासाठीचा अभ्यासक्रम बालभारतीने तयार केला आहे.

जागतिक स्तरावर मोठी मागणी 

स्पॅनिश आणि चिनी भाषेची जाण असलेल्या मनुष्यबळाला जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. स्पॅनिश भाषा अनेक विद्यापीठांमध्ये पदवी किंवा पदविका स्तरावर म्हणजेच बारावी झाल्यानंतर अभ्यासण्याचा पर्याय उपलब्ध आहे. केंद्रीय शिक्षण मंडळातही (सीबीएसई) स्पॅनिश भाषेचा अभ्यासक्रमांत समावेश आहे. चिनी भाषेचे धडे अगदी मोजक्याच विद्यापीठांमध्ये दिले जाते. या दोन्ही भाषांच्या खासगी प्रशिक्षण वर्गानाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद गेली काही वर्षे वाढत आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर आयसीएसई मंडळानंतर आता राज्य मंडळाने चिनी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या दोन्ही भाषांसाठी अभ्यासक्रम रचनेत अकरावीच्या स्तरावर अक्षर ओळख, शब्द ओळख, प्राथमिक लेखन, वाचन, उच्चार शिकणे, रोजच्या वापरातील वाक्ये बोलता येणे अशी कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतील. बारावीच्या स्तरावर लेखन कौशल्यांवर अधिक भर देण्यात आला आहे.