देशाची ‘करोना राजधानी’ बनत चाललेल्या मुंबईमध्ये या विषाणूशी टक्कर घेण्याचे लाखमोलाचे काम मुंबई महापालिकेने अहोरात्र सुरू ठेवले आहे. महापालिकेच्या योद्धय़ांचे शिलेदार महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचे करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. पण या विषाणूपासून मुंबईकर किती सुरक्षित आहेत, हे जाणून घेण्याची बहुमोल संधी ‘लोकसत्ता’च्या वाचकांना आज शुक्रवारी घरबसल्या मिळणार आहे.
‘लोकसत्ता विश्लेषण’च्या माध्यमातून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होत आहे. सर्वाधिक करोनाबाधित असलेल्या शहरांपैकी एक म्हणजे मुंबई. पण तरीही बाधितांच्या तुलनेत मृतांचे गुणोत्तर राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत कितीतरी कमी. हे कसे काय साध्य होत आहे? याचे कारण म्हणजे या संकटसमयी परदेशींकडून होत असलेले मार्गदर्शन. मग ते करोनाबाधित आणि संशयितांचे अलगीकरण आणि विलगीकरण असो किंवा करोनाबाधितांवर उपचार करण्याची अन्य रुग्णालयांमध्ये सुरू केलेली सुविधा असो, विषाणू फैलावावरील हल्ला असा सर्वंकष आणि विविधांगी होता.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने अतिशय वेगाने पावले उचलली. आरोग्य खात्यातील कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविकांनी घरोघरी फिरून तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे करोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात यश मिळत आहे. हे सगळे करत असताना कोणती आव्हाने समोर उभी राहिली, अजूनही किती आघाडय़ांवर काम सुरू आहे, हॉट-स्पॉटमधील साथ आटोक्यात आणण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत, मुंबईकरांकडून पुरेशी सावधगिरी बाळगली जात आहे का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे परदेशी यांच्याकडून अपेक्षित आहेत.
सहभागी कसे व्हाल?
करोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदी-संचारबंदीच्या काळात हा संवाद वेबच्या माध्यमातून म्हणजे मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅबद्वारे होईल. त्यासाठी http:// tiny.cc/ Loksatta_Vishleshan या लिंकवर जाऊन नोंदणी करायची आहे. ती केल्यावर आपल्या इनबॉक्समध्ये एक संदेश येईल. या संदेशावर शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी वेबसंवादाच्या काही वेळ आधी क्लिक करून सहभागी होता येईल. मात्र जागा मर्यादित आहेत, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी या https://www.loksatta.com संकेतस्थळाला भेट द्या.
याशिवाय वाचकांना सोबतचा क्यूआर कोडही स्कॅन करता येईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 1:01 am