‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचा दशकपूर्ती समारंभ आणि यंदाच्या दानयज्ञाचा सांगता सोहळा मंगळवारी, १५ डिसेंबरला संध्याकाळी ६.०० वाजता होत आहे. या निमित्ताने ज्येष्ठ  लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांचे ‘देणाऱ्याने देत जावे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यंदा निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या कार्याचा आढावाही या कार्यक्रमातून घेण्यात येणार आहे.

समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे गेल्या दहा वर्षांपासून करून दिला जात आहे. उपेक्षित, दुर्लक्षित समाजाचे दु:ख समजून घेऊन त्यांच्या जीवनमानात बदल घडवणाऱ्या, त्यांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात येतो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने या उपक्रमाद्वारे १०२ संस्थांची ओळख करून दिली. या संस्था आणि वाचक यांच्यात ‘लोकसत्ता’ने दानरूपी सेतू उभारला. यंदा या उपक्रमात महाराष्ट्राच्या जडणघडणीची साक्षीदार  असलेली प्राज्ञपाठशाळा, ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’अंतर्गत सुरू असलेली ‘जीवनशाळा’, वध्र्याचा करुणाश्रम, इचलकरंजीचे पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळ, सार्थक सेवा संघ, डोअरस्टेप स्कूल, आरंभ, वयम्, सोहम ट्रस्ट आणि सुहित जीवन ट्रस्ट या संस्थांची निवड करण्यात आली होती.

या दहाही संस्थांची निवड सार्थ ठरवत हजारो वाचक-दानशूरांनी दानयज्ञात समिधा अर्पित केल्या. यंदा कॉसमॉस बँकेच्या माध्यमातून ऑनलाइन देणगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासही दानशूरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

व्याख्यान 

* विषय : देणाऱ्याने देत जावे

* व्याख्यात्या : डॉ. अरुणा ढेरे (ज्येष्ठ लेखिका)

* कधी? मंगळवार, १५ डिसेंबर २०२०.

* वेळ : सायंकाळी ६ वाजता.

सहभागासाठी :  https://tiny.cc/LS_SarvaKaryeshuSarvada  या लिंकवर नोंदणी आवश्यक.

बॅकिंग पार्टनर

दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.