मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीने जड वाहनांसाठी फक्त डावी मार्गिका असावी, या बाबतची अधिसूचना पुणे तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या जड वाहनांविरुद्ध महामार्ग पोलिसांकडून ९ एप्रिलपासून कारवाई केली जाणार आहे. या अधिसूचनेबाबत सुरुवातीला जड वाहनांच्या चालकांमध्ये जागरूकता मोहिम राबविली जाणार आहे. त्यानंतर या नियमाचे पालन न करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
ठाण्याचे विद्यमान पोलीस आयुक्त विजय कांबळे हे महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक असताना त्यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाला दिला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल आणि या मोहिमेमुळे महामार्गावरील अपघातांना आळा बसेल, असा विश्वास महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक सुरेंद्र पाण्डेय यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.