News Flash

भाजपला ‘सिडको’ची, शिवसेनेला ‘म्हाडा’ची लॉटरी!

करारानुसार सत्तेचा ७० टक्के वाटा भाजपला तर ३० टक्के हिस्सा शिवसेनेच्या वाटय़ाला गेला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महामंडळ वाटपाचा निर्णय

मुंबई : गेली साडेतीन वर्षे सरकारकडे डोळे लावून बसलेल्या भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी असून प्रदीर्घकाळापासून केवळ चर्चेत असलेला महामंडळ वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. दोन्ही पक्षात झालेल्या तडजोडीनुसार ‘सिडको’सह वैधानिक विकास महामंडळांचे अध्यक्षपद भाजपच्या वाटय़ाला आले असून मुख्य ‘म्हाडा’ची लॉटरी मात्र शिवसेनेला लागली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांतदहा ते पंधरा महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजप आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापन करताना झालेल्या करारानुसार सत्तेचा ७० टक्के वाटा भाजपला तर ३० टक्के हिस्सा शिवसेनेच्या वाटय़ाला गेला आहे. त्यानुसार शिर्डीचे साईबाबा संस्थान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान भाजपला तर सिद्धिविनायक ट्रस्टवर शिवसेनेच्या अध्यक्षाची यापूर्वीच नियुक्ती झाली आहे. आता सिडको महामंडळ भाजपला तर मुख्य म्हाडा शिवसेनेच्या वाटय़ाला आले असून म्हाडाच्या नऊ प्रादेशिक महामंडळापैकी सहा महामंडळाचे अध्यक्षपद भाजपला मिळाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित विकास महामंडळ भाजपच्या वाटय़ाला आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा लवकच विस्तार होणार असून त्यापूर्वी महामंडळाचे वाटप करून कार्यकर्त्यांमधील रोष कमी करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे.  भाजपने सिडको वगळता बहुतांश महामंडळावरील नावे निश्चित केली असून शिवसेनेला महामंडळावरील पदाधिकाऱ्यांची नावे देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी नावे दिली नाहीत तरी भाजपच्या वाटय़ाच्या महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली.

लोकसभा उमेदवारांची चाचपणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सरकारी विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने केलेल्या मराठवाडा दौऱ्यात भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी केल्याचे  समजते. स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर शिवसेना ठाम राहिल्यास भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार ठेवण्याच्या रणनीताचाच तो भाग आहे. फडणवीस,  गडकरी यांनी गुरुवारी परभणी, नांदेड, बीड या तीन जिल्ह्य़ांत कार्यक्रम घेतले.स्वबळावर लढल्यास परभणीत मंत्रिमंडळातील मराठा समाजातील एक प्रभावी नेत्याचा विचार सुरू आहे. नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात त्यांच्या एका पारंपरिक  विरोधकाला उतरवण्याच्या दृष्टीने यावेळी अंदाज घेण्यात आला. भाजपच्या संसदीय राजकारणातून काहीसे बाजूला पडलेल्या एका माजी केंद्रीय राज्यमंत्र्यास औरंगाबादमधून पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची चाचपणीही सुरू असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 2:26 am

Web Title: legal development corporation cidco to hold bjp whare as shiv sena get mhada
Next Stories
1 ‘आधार’सक्तीमुळे ‘अमृत आहार’ योजनेतील बालकांच्या पोषण आहारावर घाला!
2 नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार
3 चंद्रपूरमध्ये जगातील सर्वाधिक तापमान
Just Now!
X