|| उमाकांत देशपांडे

शिवसेना भाजपबरोबर राहिल्यास पद देण्याचा विचार

शिवसेना भाजपविरोधात आक्रमक असल्याने विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक तूर्तास न घेण्याचे भाजपने ठरविले असल्याचे ज्येष्ठ भाजप मंत्र्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शिवसेना भाजपबरोबर राहिल्यास हे पद त्यांना दिले जाऊ शकते. भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अन्य अपक्ष सदस्यांच्या पाठबळावर विधान परिषदेत बहुमतासाठी संघर्ष असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी सभापती व उपसभापती पदासंदर्भात कोणती भूमिका घ्यायची, याचा निर्णय त्या वेळीच घेण्याचा भाजपचा विचार असल्याचेही या मंत्र्याने स्पष्ट केले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची मुदत २७ जुलै रोजी संपत असल्याने त्यांनी पावसाळी अधिवेशन काळात १८ जुलै रोजीच उपसभापतीपदाचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेतील ७८ सदस्यांमध्ये भाजपच्या सदस्यांची संख्या २२ असून महादेव जानकर, प्रशांत परिचारक यांचा पाठिंबा गृहीत धरता संख्याबळ २४ झाले आहे. नागो गाणार व श्रीकांत देशपांडे यांनी भाजपला पाठिंबा दिला, तर शिवसेनेच्या १४ सदस्यांचा पाठिंबा गृहीत धरून भाजप-शिवसेना युतीकडे ४० पर्यंत संख्याबळ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी १७ सदस्य असून शेकापचे जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे व अन्य सदस्यांचा पाठिंबा गृहीत धरता ३८ सदस्यांचे संख्याबळ आहे. दोन अपक्ष भाजप-शिवसेनेकडे जातात की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातात, यावर सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या पदाची मुदत २०२२ पर्यंत असली तरी भाजप-शिवसेनेकडे अन्य अपक्षांचा पाठिंबा गृहीत धरता बहुमत असल्याचा त्यांचा दावा आहे. पण शिवसेना भाजपविरोधात आक्रमक भूमिकेत असल्याने शिवसेनेला तूर्तास उपसभापतीपद न देण्याचे भाजपने ठरविले आहे. सभापतीपदावरून नाईक-निंबाळकरांना हटवायचे असल्यास भाजपला ते सोपे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी  भक्कम आहे आणि शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला गेला, तशी परिस्थिती नाही. अविश्वास ठरावासाठी आणि निवडणुकीसाठी १४ दिवसांची नोटीस आवश्यक असून ती अद्याप देण्यात आलेली नाही. हिवाळी अधिवेशन दोन आठवडय़ांचेच असून ९ दिवसच कामकाज होणार आहे. विधानसभेतील उपाध्यक्षपद गेली ४ वर्षे रिक्तच आहे.