News Flash

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र?

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर उमेदवारी अर्जासाठी आमदारांच्या स्वाक्षऱ्या काँग्रेसने घेतल्या आहेत.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी नवी समीकरणे; राणेंना शह देण्याचा प्रयत्न

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजप व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना शह देण्याकरिता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा करण्याची योजना आखली आहे. हा उमेदवार अराजकीय व आर्थिकदृष्टय़ा सक्षम असेल, असे संकेत काँग्रेसकडून देण्यात आले.

नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्तअसलेल्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत असून, त्याची रणनीती तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात कोणती भूमिका घ्यायची हे ठरविण्याकरिता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही जागा काँग्रेसची असल्याने ती लढविण्याबाबत काँग्रेसनेच पुढाकार घ्यावा, असे राष्ट्रवादीच्या वतीने सुचविण्यात आले. नारायण राणे हे रिंगणात उतरतील हे गृहीत धरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यूहरचना आखली आहे. राणे हे शिवसेना आणि काँग्रेसचे कट्टर विरोधक आहेत. यामुळेच राणे यांना शह देण्याकरिता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र यावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून, शिवसेनेने तयारी दर्शविल्याचे सांगण्यात येते. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर उमेदवारी अर्जासाठी आमदारांच्या स्वाक्षऱ्या काँग्रेसने घेतल्या आहेत.

१२ डिसेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त मोर्चा

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने विधान भवनावर संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले.

बैठकीला अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, जयंत पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीने १ ते ११ डिसेंबर या काळात दिंडी आयोजित केली आहे. तर काँग्रेसचा मोर्चा १३ तारखेला पोहचणार होता. पण दोन्ही काँग्रेसने एकत्र मोर्चा काढण्याकरिता आपापल्या नियोजित तारखांमध्ये बदल केला.

दोन्ही काँग्रेसचे मोर्चे टी चौकात एकत्र येतील. तेथून पुढे संयुक्त मोर्चा काढण्यात येईल.

माहिती तंत्रज्ञान विभागात काय चालले आहे ?

शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णपणे फसली असून, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विजय गौतम यांना बळीचा बकरा बनविले जाण्याची शक्यता आहे. पण खरे सूत्रधार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू कौस्तुभ धवसे यांच्या विरोधात कारवाई का केली जात नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

भाजप नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच नारायण राणे यांचा निर्णय

नारायण राणे यांची विधान परिषदेची पोटनिवडणूक लढण्याची तयारी झाली आहे. पण भाजपने आपले पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. भाजप नेत्यांशी चर्चा करूनच राणे हे निर्णय घेणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन उमेदवार उभा केला तरीही राणे यांना निवडणूक जड जाणार नाही. उलट विरोधकांची काही मते राणे यांना मिळण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने राणे यांच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात हे लक्षात घेऊन राणे यांनी ही पोटनिवडणूक लढवू नये, असा प्रयत्न होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 3:54 am

Web Title: legislative council by elections shiv sena congress ncp narayan rane
Next Stories
1 तूरडाळ विक्रीत भेदभाव!
2 सहा खासदार, २१ आमदार लवकरच निवृत्त
3 पहिल्या देशी बनावटीच्या विमानावर अखेर शिक्कामोर्तब
Just Now!
X