वागळे इस्टेट परिसरातील लेनसेस कंपनीच्या इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील कॉफी शॉपला रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. रविवारी कंपनीचे कार्यालय बंद असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाल्याचे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
लेनसेस हाऊस या इमारतीत पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर लेनसेस कंपनीचे कार्यालय आणि कॉफी शॉप आहे.  
आग लागल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी पाच फायर इंजिन, दोन वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. आग वरच्या मजल्यावर असल्याने ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता.  ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यक्त केला आहे.