अंधेरीतून पकडलेल्या मादी बिबटय़ाचा दुसऱ्या बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू गतवर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब वसाहतीतून जेरबंद करण्यात आलेल्या दोन वर्षांच्या मादी बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन आठवडय़ांपूर्वी राष्ट्रीय उद्यानाच्या मालाड पूर्वेजवळील हद्दीत ही मादी जबर जखमी अवस्थेत आढळली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अधिवासात स्वत:चे क्षेत्र बनवण्यासाठी दुसऱ्या बिबटय़ाशी झालेल्या झटापटीत ती गंभीर जखमी झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. मात्र यानिमित्ताने राष्ट्रीय उद्यानातील मानवी अतिक्रमणामुळे बिबटय़ांच्या अधिवासाचे घटत चाललेल्या क्षेत्राचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. शेर-ए-पंजाब वसाहतीतील ‘ज्युनियर क्राफ्टिंग’ या लहान मुलांच्या शाळेत १० डिसेंबर रोजी शिरलेल्या मादी बिबटय़ाला तब्बल १३ तासांच्या प्रयत्नानंतर राष्ट्रीय उद्यानाच्या विशेष बचाव पथकाने जेरबंद केले होते. आईपासून भटकल्याने किंवा स्वत:ची हद्द बनविण्यासाठी भटकत असताना ती चुकून या परिसरात आल्याचा अंदाज त्या वेळी बांधण्यात आला होता. त्यामुळे ठाणे वनविभागाने या मादीला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून तिला ११ डिसेंबर रोजी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा सोडले होते. दोन आठवडय़ांपूर्वी मालाड पूर्वेकडील रहेजा हाईट्सच्या मागच्या बाजूस असणाऱ्या राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत एक बिबटय़ा गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार बिबटय़ाला उपचारासाठी वनधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तेव्हा ही मादी बिबटय़ा अंधेरीत आढळलेली असल्याचे उघड झाले. मादीची सुटका करतेवेळेत तिच्या शरीरात बसवलेल्या मायक्रोचिपमुळे तिची ओळख स्पष्ट झाल्याचे उद्यानातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या मादीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. मालाडमधून ताब्यात घेतेवेळीच बिबटय़ाची शारीरिक परिस्थिती गंभीर होती. तपासणी केली असता तिच्या बरगडय़ांमधील चार हाडे तुटल्याने फु प्फुसामध्ये संसर्ग झाला होता. हा संसर्ग बळावल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. ही मादी बिबटय़ा उद्यानातील अधिवासात स्वत:चे क्षेत्र बनवत होती. त्यामुळे दुसऱ्या बिबटय़ाशी झालेल्या झटापटीत तिला गंभीर दुखापत झाल्याची शक्यता डॉ. पेठे यांनी वर्तवली. अतिक्रमण जबाबदार नुकत्याच जाहीर झालेल्या बिबटय़ा गणनेच्या सर्वेक्षणात दोन बिबटे आपले क्षेत्र वाटून त्यामध्ये एकत्र संचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. साधारण दोन वर्षांपर्यंत बिबटय़ाचे पिल्लू त्यांच्या आईसोबत राहते. त्यानंतर विलग होऊ न ते आपले स्वतंत्र क्षेत्र तयार करते. हे क्षेत्र निर्माण करताना बऱ्याचदा दोन बिबटय़ांमध्ये झटापट होऊन प्रसंगी मृत्यूही होण्याची शक्यता असते, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी दिली. राष्ट्रीय उद्यानाचे बफर झोन नष्ट झाल्यामुळे बिबटय़ांची क्षेत्रे कमी होत असल्याचे वन्यजीव संशोधक कृष्णा तिवारी यांनी सांगितले.