आयआयटी मुंबईच्या संकुलातील मेकॅनिकल कार्यशाळेत शिरलेला बिबटय़ा शुक्रवारीही दिवसभर तेथेच मुक्काम ठोकून होता. नाना प्रयत्न करून बिबटय़ाला पकडण्यात अपयशच आल्याने आता अखेर एका पिंजऱ्यातून वनकर्मचारी आत पाठवून बिबटय़ाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
बुधवारी बिबटय़ाने आयआयटीच्या संकुलातील मॅकेनिकल अभियांत्रिकी शाखेच्या कार्यशाळेत शिरकाव केला. त्या दिवसापासून बिबटय़ाला बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रयत्नांना यश आलेले नाही. बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी, त्याच्या हालचाली जाणून घेण्याच्या उद्देशाने आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आतमध्ये कॅमेराही सोडला. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.
आता या बिबटय़ाला योग्य वेळ पाहून इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून बाहेर काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. एका पिंजऱ्यातून वन कर्मचाऱ्याला आत पाठवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या पिंजऱ्यात वन अधिकारी सुरक्षा जॅकेट्स परीधान करून बिबटय़ाच्या जवळ पोहचतील आणि त्याला इंजेक्शन दिले जाईल. गुरुवारी रात्री हा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात यश आले नाही. शुक्रवारी रात्री पुन्हा असाचा प्रयत्न करण्यात येणार आहे.