आयआयटी मुंबईच्या संकुलातील मेकॅनिकल विभागाच्या कार्यशाळेत शिरलेला बिबटय़ा दिवस उलटून गेल्यावरही जाळय़ात सापडलेला नाही. वन अधिकाऱ्यांची त्याने चांगलीच दमछाक केली आहे.
बुधवारी बिबटय़ाने आयआयटी- च्या मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेच्या कार्यशाळेत शिरकाव केला. ही बाब तेथील कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सुरक्षा रक्षक आणि वन अधिकाऱ्यांना कळविले. तेव्हापासून या ठिकाणी वन अधिकारी जाळे लावून तयार आहेत. मात्र बिबटय़ा अद्याप जाळय़ात आलेला नाही. बिबटय़ा खूप अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला इंजेक्शन देऊन बाहेर काढणेही शक्य नसल्याचे सूत्रांकडून समजते. परिणामी या बिबटय़ाला भूक लागेल आणि तो जाळय़ात येईल याची वाट पाहण्याशिवाय काही उपाय नसल्याचे सध्याचे चित्र आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत बिबटय़ाला पकडण्यात वन विभागाला यश आले नव्हते.