संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी; वनविभागाच्या व्यूहरचनेला यश

मुंबई : अंधेरी-कुर्ला मार्गावरील जेबी नगर येथील बंद पडलेल्या कंपनीच्या रिकाम्या इमारतीतील बिबटय़ाला अखेर सोमवारी सकाळी पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. बिबटय़ाला पकडण्यासाठी रविवारी सकाळपासून कॅमेरा ट्रॅप आणि पिंजरे लावण्यात आले होते. त्यामुळे २४ तासांच्या आत बिबटय़ास पकडणे शक्य झाले.

जेबी नगर येथील वजीर ग्लास वर्क्‍स या कं पनीच्या रिकाम्या ओसाड इमारतीत रविवारी सकाळी बिबटय़ा शिरल्याची माहिती वन विभागास प्राप्त झाली. त्यापूर्वी बिबटय़ाने जवळच्याच एका इमारतीच्या कंपाऊड भिंतीवरून उडी मारली होती. त्यानंतर वन विभागाने त्वरित त्या ठिकाणी धाव घेऊन बंदोबस्त केला. हा परिसर सुमारे १२ एकरचा असून, २० वर्षांपासून ही इमारत ओसाड असल्याने तेथे बरीच झाडेझुडपे माजली आहेत.

बिबटय़ास पकडण्यासाठी पाच कॅमेरा ट्रॅप आणि तीन पिंजरे सज्ज केले. वन विभाग, वन्यजीव बचाव क्षेत्रात कार्यरत संस्थांचे कार्यकर्ते, पोलीस आणि राज्य राखीव दलाचे जवान यांचा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता. कॅमेरा ट्रॅप वगैरे सामग्रीचे नियंत्रण जवळच्याच एका इमारतीतून करण्यात आले. सोमवार सकाळी ६ वाजेपर्यंत बिबटय़ाचे अस्तित्व कॅमेरामध्ये दिसले नव्हते. त्यानंतर पिंजरे तपासण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना बिबटय़ा पिंजऱ्यात बंदिस्त झाल्याचे दिसून आले.

ताबडतोब पिंजरा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हलविण्यात आला. तेथे पशुवैद्यकांकडून त्याची तपासणी करण्यात आली. बिबटय़ा ठणठणीत असल्याने त्यानंतर त्यास राष्ट्रीय उद्यानात निसर्गमुक्त करण्यात आल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. हा पूर्ण वाढ झालेला प्रौढ बिबटय़ा आहे.

दोन वर्षांपूर्वी मरोळ येथून एका बिबटय़ाला पकडून त्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. जेबी नगर येथे असलेला बिबटय़ा हाच असावा का, असा तर्क व्यक्त केला जात आहे. त्यासाठी या बिबटय़ाच्या शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या पॅटर्नचे छायाचित्र घेण्यात आले असून, त्याची पडताळणी दोन वर्षांपूर्वी पकडलेल्या बिबटय़ाशी केली जाईल, असे रॉ या वन्यजीव बचाव संस्थेचे पवन शर्मा यांनी सांगितले. मात्र एकदा पिंजऱ्यात अडकल्याचा अनुभव असलेला बिबटय़ा पुन्हा इतक्या सहजपणे पिंजऱ्यात येईल का? याबाबत वनाधिकारी शंका व्यक्त करत आहेत.

जवळचा बिबटय़ाचा अधिवास आरेपासून हे अंतर सुमारे तीन ते साडेतीन किमी इतके आहे. गेल्या काही महिन्यांत टाळेबंदीमुळे अनेक भाग निर्जन असल्याने हा बिबटय़ा येथे आला असावा, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी मांडली.

मानव-बिबटय़ा सहअस्तित्वाचा अभ्यास

राज्याचा वन विभाग आणि वाइल्ड लाइफ कन्झव्‍‌र्हेशन सोसायटी, इंडिया यांच्यामार्फत मानव-बिबटय़ा सहजीवनाच्या अभ्यासासाठी एक विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये बिबटय़ांचा दूरमिती (टेलिमेट्री) अभ्यास केला जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानातील पाच बिबटय़ांना जीपीएस-जीएसएम कॉलर बसवण्यात येतील. या प्रकल्पासाठी या बिबटय़ाचे उदाहरण महत्त्वाचे ठरू शकते. बिबटय़ा हा परिस्थितीशी लगेच जुळवून घेणारा प्राणी असल्याने दाट मानवी वस्तीमध्ये राहू शकला असावा, असे मत ज्येष्ठ व्याघ्रतज्ज्ञ विद्या अत्रेय यांनी व्यक्त केले. अशा वेळी बिबटय़ा त्या ठिकाणी कसा पोहोचला, किती काळ होता, त्याने त्या दरम्यान काय केले असावे अशा सर्व बाबींचा उलगडा पुढील काळात होऊ शकेल.