मोठय़ा संख्येने पदे रिक्त, तरतुदीच्या तुलनेत खर्चही अत्यल्प

जगातील कुष्ठरुग्णांच्या संख्येचा विचार करता भारतात ६५ टक्के कुष्ठरुग्ण असून महाराष्ट्रात २०१७-१८ मध्ये १६,०६५ कुष्ठरुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कुष्ठरुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असून आरोग्य खात्याच्या कुष्ठरोग निर्मूलन विभागातील अपुऱ्या पदांमुळे असलेला निधीही या कामी खर्च होत नसल्याचे या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

कुष्ठरोगी शोधण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार फेब्रुवारी २०१७ मध्ये राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत ११,०२९ रुग्ण शोधण्यात आले. त्यानंतर २०१८ मधील मोहिमेमध्ये तब्बल १६,०६५ रुग्ण नोंदविण्यात आले. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण १०.११ टक्के एवढे असले तरी आरोग्य विभागात अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे संपूर्ण सर्वेक्षण झालेच नसल्याचे आरोग्य विभागातीलच डॉक्टरांचे म्हणणे आहे. कुष्ठरोग विभागात साहाय्यक संचालकांची (कु ष्ठरोग) एकूण ४० मंजूर पदे असून त्यापैकी १४ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची दहा पदे तर अवैद्यकीय पर्यवेक्षकांची ५० पदे भरण्यातच आलेली नाहीत. यातील गंभीर बाब म्हणजे मधल्या काळात शासनाने अवैद्यकीय साहाय्यकांच्या ९७९ पदांपैकी ५०३ पदे अतिरिक्त ठरवून रद्द केली.

उर्वरित ४७६ पदांमधील १४० पदे भरण्यात आली नसून प्रयोगशाळा तंत्रज्ञांपासून विविध संवर्गातील अनेक पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागाचा कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम किती प्रभावीपणे राबविला जात असेल याची कल्पना येऊ शकते, असे आरोग्य विभागातील एका ज्येष्ठ डॉक्टराने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. कुष्ठरुग्णांसाठी फिजिओथेरपिस्ट आणि पॅरॅमेडिकल वर्कर्सची मोठय़ा प्रमाणात गरज असून गेल्या वर्षी आरोग्य विभागाने फिजिओथेरपिस्टची २१ पदे भरण्याला मान्यता दिली खरी, मात्र प्रत्यक्षात अवघी ५ पदे भरण्यात आली तर पॅरामेडिकल वर्कर्सच्या मंजूर असलेल्या २१५ पदांपैकी अवघी १३१ पदेच भरण्यात आली आहेत.

कुष्ठरुग्णांसाठी वैद्यकीय पुनर्वसनाची योजना राबविण्यात येते. या अंतर्गत विकृती असलेल्या रुग्णांची पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, गरजू रुग्णांना एम.सी.आर. चप्पल, गॉगल्स तसेच स्प्लिटस्सह आवश्यक गोष्टीही दिल्या जातात. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून आणि आरोग्य विभागाचा कारभार शिवसेनेचे मंत्री दीपक सावंत पाहात असल्यामुळे कुष्ठरुग्णांचे पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांचे प्रमाण गेल्या चार वर्षांत सातत्याने कमी होताना दिसते. २०१४-१५मध्ये ३८९ कुष्ठरुग्णांच्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत अनुक्रमे ३०६, २५८ आणि गेल्या डिसेंबरअखेपर्यंत अवघ्या १६१ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. कागदोपत्री कुष्ठरुग्णांचे प्रमाण जास्त दिसत नसले तरी प्रत्यक्षात ही आकडेवारी खूप जास्त असल्याचे आनंदवन येथील महारोगी सेवा समितीचे कौस्तुभ आमटे यांनी सांगितले. कौस्तुभ यांच्या म्हणण्यानुसार कुष्ठरुग्णांसाठीच्या त्यांच्या संस्थेचे अनुदानही आरोग्य विभागाकडून वेळेवर दिले जात नाही.