क्षयरुग्ण व कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. १ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२० दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहीमेअंतर्गत पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत.

क्षयरोगाचा प्रभाव अधिक जाणवलेल्या परिसरामधील साधारपणे १२ लाख १२ हजार ६९३ घरातील ५० लाख ९ हजार २७७ व्यक्तींची क्षयरोग व कुष्ठरोग तपासणी करण्यात येणार आहेत. या तपासणी अभियानासाठी महापालिकेची ३ हजार ४५१ पथके कार्यरत असणार आहेत. या पथकांद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या दरम्यान भेटी देऊन क्षयरोग व कुष्ठरोग विषयक वैद्यकिय तपासणी केली जाणार आहे.

घरातील व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास दिवसातील इतर वेळी भेट देऊन तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी तपासणी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

प्राथमिक तपासणी दरम्यान आढळणाऱ्या क्षयरोग संशयित रुग्णांच्या बेडख्याची तपासणी करण्यासह क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी संशयित रुग्णांच्या परिसराजवळ असणाऱ्या पालिकेच्या किंवा सरकारी प्रयोगशाळेत मोफत केली जाणार आहे. तसेच क्ष-किरण चाचणी देखील निर्धारित करण्यात आलेल्या खासगी क्ष-किरण केंद्रामध्ये मोफत केली जाणार आहे. निर्धारित करण्यात आलेल्या खासगी क्ष-किरण केंद्रामध्ये मोफत तपासणी करता यावी यासाठी संशयित रुग्णाला विशेष ‘व्हाऊचर’ देण्यात येणार आहेत. ज्यामुळे संशयित रुग्णाला खासगी क्ष-किरण केंद्रामध्ये जाऊन मोफत चाचणी करवून घेता येणार आहे. क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत.

या अभियनादरम्यान आढळून येणाऱ्या कुष्ठरोग संशयितांना नजिकच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात संदर्भीत करण्यात येणार आहे. कुष्ठरोग संशयितांची तपासणी ही वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.

कुष्ठरोगाची लक्षणे : कुष्ठरोगाच्या लक्षणांमध्ये त्वचेवर फिकट, लालसर चट्टा असणे, त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर, तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोटय़ापासून लुळा पडणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालतांना पायातून चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून आल्यास संबंधितांनी तातडीने महापालिकेच्या वा सरकारी रुग्णालयातून कुष्ठरोगाची तपासणी करवून घ्यावी. कुष्ठरोगाचे लवकर निदान करुन औषधोपचार चालू केल्यास होणारे शारीरिक व्यंग टाळता येते, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली.

क्षयरोगाची लक्षणे : १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, दोन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ ताप असणे किंवा सायंकाळच्या वेळेस ताप येणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीमधून रक्त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सूज असणे, ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.