|| शैलजा तिवले

९१ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण, सुमारे १७ हजार संशयित रुग्ण

मुंबई महानगरपालिकेने २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या काळात राबविलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये २८ नवे रुग्ण आढळले. शहरातील तब्बल ९१ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण केले आणि यामध्ये सुमारे १७ हजार संशयित रुग्ण आढळले आहेत.

राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाअंतर्गत पालिकेने घरोघरी भेट देऊन कुष्ठरुग्णांची शोध मोहीम २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर काळात शहरात राबविली आहे. मोहीममध्ये सुमारे १० लाख कुटुंबांपैकी ९१ टक्के म्हणजे सुमारे नऊ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील सुमारे ४७ लाख लोकसंख्येपैकी सुमारे २७ लाख व्यक्तीची तपासणी केली गेली.

मोहिमेमध्ये सुमारे १७ हजार कुष्ठरोग संशयित रुग्ण आढळले असून यांना पुढील तपासणीसाठी आरोग्य केंद्रावर पाठविण्यात आले. यातील वांद्रे भागामध्ये सर्वाधिक संशयित रुग्ण(१,२२८) आढळले आहेत. त्याखालोखाल चेंबूर (१३८६), परेल(७९७) संशयित रुग्ण मोहिमेदरम्यान आढळलेत. या संशयित रुग्णापैकी केवळ ७००९ (४४ टक्के) रुग्ण तपासणीसाठी आरोग्य केंद्रावर पोहचलेत. आरोग्य केंद्रावर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये २८ नवे रुग्ण आढळलेत. यापैकी यातील १५ रुग्ण हे बहुजीवाणू (मल्टीबॅसिलरी) आणि १३ रुग्ण अल्पजीवाणूचे(पॉसिबॅसेलरी) आहेत. तसेच २८ या नवीन रुग्णांमध्ये तीन बालकांचा समावेश आहे.

शोधमोहिमेमध्ये एक स्वयंसेवक आणि एक विद्यार्थी असे २७०० चमू सहभागी झाले होते. प्रत्येक चमूने दरदिवशी २५ घरांचे सर्वेक्षण केले आहे. संशयित रुग्णापैकी अद्याप ५६ टक्के संशयित रुग्णांची डॉक्टरांमार्फत तपासणी झालेली नाही. हे रुग्ण आरोग्य केद्रावर तपासणीसाठी हजर झालेले नसले तरी पुढील काळात घरोघरी जाऊन डॉक्टरामार्फत त्यांची तपासणी केली जाईल. त्यामुळे नवीन रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. राजू जोटकर यांनी सांगितले.

आरोग्यसेविकांशिवायही मोहीम यशस्वी

आरोग्यसेविकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शविला असला तरी स्वयंसेवक आणि संस्थांच्या मदतीने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. आरोग्यसेविकांच्या सहभागाने मोहीम अजून चांगल्यारीत्या यशस्वी झाली असती, हे जरी खरे असले तरी त्यांच्या सहकार्याशिवायदेखील ही पूर्ण करण्यामध्ये बऱ्यापैकी यश प्राप्त झालेले आहे, असे कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. राजू जोटकर यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले.

कुष्ठरुग्ण शोध मोहीम

  • ९१ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण
  • संशयित रुग्णांची संख्या सुमारे १७ हजार
  • ४५ टक्के संशयित रुग्णांमधून २८ नवे कुष्ठरोगाचे रुग्ण
  • उर्वरित ५६ टक्के संशयित रुग्णांमधून नव्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता
  • मुंबईत एप्रिल ते सप्टेंबर २०१८ काळात राबविलेल्या शोध मोहिमेमध्ये १९५ नवे रुग्ण आढळले होते. दर दहा हजार लोकसंख्येमागे शहरातील कुष्ठरोगाचे प्रमाण ०.२२ टक्के आहे.