कौस्तुभ आमटे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
गेल्या दहा वर्षांतील महागाईने इतर सर्वच गोष्टींसोबत उपचार खर्चही दुपटीतिपटीवर नेला आहे. त्यात समाजाकडून कायम उपेक्षित असलेल्या कुष्ठरुग्णांसाठी लढणाऱ्या सामाजिक संस्थांनाही निधी उभारण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपल्या वेतनवाढीसाठी सतत जागरूक असलेले मंत्रालयातील बाबू आणि राजकारणी कुष्ठरुग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात वाढविण्यास उदासीन असल्यामुळे उभी हयात कुष्ठरुग्णांसाठी समर्पित जीवन जगलेल्या बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ विकास आमटे हे कुष्ठरुग्णांच्या भल्यासाठी शासनाचा पाठपुरावा करीत आहेत.
एकटय़ा ‘आनंदवन’मध्ये आज १६५० कुष्ठरुग्ण असून त्यांना वर्षांकाठी सुमारे तीन कोटी ८० लाख रुपये खर्च येतो, तर शासनाकडून तीन कोटी दोन लाख रुपये मदत दिली जाते. ‘आनंदवन’मध्ये बायोगॅस प्रकल्प नसता तर त्यांचा खर्च साडेचार कोटी रुपये झाला असता. या कुष्ठरुग्णांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी काही चांगले प्रकल्प करण्याबरोबर अनेक नवीन गोष्टी करण्याचा कौस्तुभ यांचा मानस आहे. आजघडीला १६ संस्थांमधून सुमारे चार हजार कुष्ठरुग्णांची जपणूक केली जाते. या संस्थांना सरकारकडून सुमारे सात कोटी रुपये अनुदानापोटी मिळत असून वाढती महागाई लक्षात घेऊन ३६०० रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी कौस्तुभ आमटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पत्राद्वारे केली.

सध्या संस्थांना मोठय़ा आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. पूर्ण बऱ्या झालेल्या कुष्ठरुग्णांना समाजात परत जाऊन सन्मानाने आयुष्य जगता यावे यासाठी ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ व अन्य संस्थांतर्फे त्यांना व्यवसाय प्रशिक्षित केले जाते. आमची मागणी मान्य केल्यास शासनाला जास्तीत जास्त दहा कोटी रुपयांचा भार सोसावा लागेल. त्यामुळे आमची मागणी तात्काळ मान्य करावी. – कौस्तुभ आमटे

पुरेशा मदतीची गरज

’राज्यात दरवर्षी सोळा हजारांहून नवीन कुष्ठरुग्ण शोधले जात असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना पुरेशी आर्थिक मदत करण्यास सरकारचा हात आखडता राहिला आहे. २०१२ साली शासनाने प्रति कुष्ठरुग्ण प्रति महिना ४५० रुपयांवरून २२०० रुपये अशी वाढ केली होती.
’यामध्ये रुग्णाचे दोन्ही वेळचे जेवण, नाश्ता, राहणे, कपडे, औषधे, फर्निचर, वीज बिल, इमारत दुरुस्ती तसेच पाणीपट्टी आदींची जबाबदारी संबंधित संस्थांना उचलणे बंधनकारक केले होते.
’सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या आनंदवनसारख्या संस्थांना समाजातील दानशूर लोकांकडूनही मदतीचे हात मिळत असल्यामुळे हा भार ते आनंदाने स्वीकारत होते; परंतु महागाई लक्षात घेता शासनाकडून किमान ३६०० रुपये मदत मिळावी अशी कौस्तुभ आमटे यांची मागणी आहे.