|| शैलजा तिवले

तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे निदानास विलंब

मुंबईत कुष्ठरोगाच्या नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी ११ टक्के रुग्ण हे या आजाराने व्यंगत्व आल्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्यावर उपचारांसाठी येत असल्याचे २०१८ च्या आकडेवारीतून निदर्शनास आले. कुष्ठरोगाबाबत समाजामध्ये असलेले अपसमज, अज्ञान, न खाजणाऱ्या किंवा न दुखणाऱ्या त्वचेवरील डागाकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती आणि तज्ज्ञ डॉक्टरांसह निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे या आजाराच्या निदानास विलंब होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

उपचारांसाठी उशिरा आल्याच्या कारणांचे निदान करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश रुग्णांनी या आजाराबाबत अपुरी माहिती असल्याचे नोंदविले. तर हा आजार कलंक समजला जात असल्यामुळे काही रुग्णांनी उपचारांसाठी येण्याचे टाळले. काही रुग्णांनी अनेक डॉक्टरांकडे उपचार घेऊनही योग्य निदान न झाल्याचेही नमूद केले आहे.

सर्वेक्षणासाठी घरांमध्ये गेल्यानंतर कुष्ठरोग म्हटले की आमच्याकडे कोणी नाही, असे सांगत बोलणे टाळले जाते. त्यात अनेकदा न खाजणाऱ्या किंवा न दुखणाऱ्या त्वचेवरील डागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसून येते. कुष्ठरोग म्हणजे हाताची, पायाची बोटे झडणे हीच लक्षणे माहीत आहेत. आजाराबाबतची अपुरी माहिती, अज्ञान, समाजातून वाळीत टाकले जाण्याची भीती यातूनही हे रुग्ण उपचारांसाठी पुढे येत नाहीत. यांच्यापासून अन्य जणांनाही आजार होण्याची शक्यता असल्याने हा आजार लपून राहणेही घातक आहे, असे मत मुंबई जिल्हा कुष्ठरोग विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. राजू जोटकर यांनी व्यक्त केले.

एकजिवाणू (पॉसिबॅसिलरी) आणि बहुजिवाणू (मल्टीपॉसिबॅसिलरी) या दोन्ही वर्गातील रुग्णांना जीडी२ पर्यंतचे व्यंगत्व येते. मात्र मल्टीपॉसिबॅसिलरी वर्गातील रुग्णांना अशा प्रकारचे व्यंगत्व येण्याची शक्यता अधिक असते. यात रुग्णांना हात, पायामध्येच व्यंगत्व आल्याचे दिसून आले. यातील बहुतांश रुग्णांमध्ये उपचारानंतर व्यंगत्वाचे प्रमाण कमी झाले. २.१ टक्के रुग्णांमध्ये मात्र उपचारादरम्यान आणि नंतर व्यंगत्व आल्याचे दिसते. मात्र तरीही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कुष्ठरोगमुक्त होण्यासाठी समाजात या आजाराबाबतचे भय आणि अपसमज कमी होणे, लक्षणांबाबत जनजागृती आणि सोबतच वेळेत निदान करणारी व्यवस्था अधिक सक्षम होणे आवश्यक असल्याचेही पुढे डॉ. जोटकर यांनी सांगितले.

निदान करण्यात अडचणी..

कुष्ठरोग हा स्वतंत्र विभाग आरोग्य विभागात वर्ग केल्याने कर्मचाऱ्यांपासून ते निधीपर्यंत सर्वच बाबींची वानवा आहे. पूर्वीचे बहुतांश तज्ज्ञ डॉक्टर निवृत्त झाले आहेत. नव्याने आलेल्या डॉक्टरांना पुस्तकी ज्ञान असले तरी प्रत्यक्ष रुग्ण अधिक प्रमाणात न पाहिल्याने तितकी अजून या आजाराच्या निदानावर पकड नाही. तज्ज्ञ डॉक्टरांसह निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळेही निदानाच्या टप्प्यावर अजूनही वेळ लागत असल्याचे मत कुष्ठरोग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

काळजीची बाब..

शहरात एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात ३६२ रुग्ण नव्याने आढळले. यातील ६३ टक्के रुग्ण हे बहुजिवाणू (मल्टीबॅसिलरी) वर्गातील आहेत. यामध्ये चिंताजनक बाब अशी की, यातील ४० म्हणजेच ११ टक्के रुग्णांना कुष्ठरोगाची बाधा होऊन दुसऱ्या श्रेणीतील (जीडी२)व्यंगत्व आलेले होते.