महापालिका स्वयंसेविकांचा पवित्रा; कुष्ठरुग्ण शोधमोहिमेचा फज्जा

किमान वेतनास नकार मिळाल्यामुळे घरोघरी जाऊन मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पालिकेच्या आरोग्य स्वयंसेविकांनी दैनंदिन कामाव्यतिरिक्त अन्य कोणतेही काम न करण्याचे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कुष्ठरुग्ण शोधमोहिमेचा फज्जा उडाला आहे. पुढील महिन्यात शाळांमध्ये राबविण्यात येणारी केंद्र सरकारची ‘एमआर’ लसीकरण मोहीमही अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

कुष्ठरुग्ण शोधमोहिमेचे काम न केल्याने संतापलेल्या पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे काम न करणाऱ्या आरोग्य स्वयंसेविकांची अनुपस्थिती नोंदवून त्यांना मानधन न देण्याचा निर्णय घेतल्याची कुणकुण स्वयंसेविकांना लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेमुदत काम बंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात स्वयंसेविका आहेत.

कुटुंब नियोजनापासून साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिकेच्या आरोग्य स्वयंसेविका दररोज पायपीट करीत घरोघरी जावे लागते. या आरोग्य स्वयंसेविकांना दर महिन्याला केवळ पाच हजार रुपये मानधन दिले जाते.

आपल्याला किमान वेतन द्यावे, पालिकेच्या सेवेत कायम करावे, आदी मागण्यांसाठी आरोग्य स्वयंसेविकांनी ऑगस्टमध्ये बेमुदत आंदोलन सुरू केले होते. मात्र मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मध्यस्थी करीत आरोग्य स्वयंसेविकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वयंसेविकांचे प्रश्न सोडविण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात येतील, असे आश्वासनही दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बैठकही घेतली, मात्र या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आरोग्य स्वयंसेविकांमध्ये असंतोष धगधगू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर आरोग्य स्वयंसेविकांना मुंबईमध्ये कुष्ठरोग झालेल्या रुग्णांच्या शोधमोहिमेची जबाबदारी देण्यात आली. एका स्वयंसेविकेसोबत एक विद्यार्थी अशी रचना करून दर दिवशी २५ घरांमध्ये पाहणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने त्यांना दिले होते. ही मोहीम २४ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात राबविण्यात येणार होती. मात्र दैनंदिन कामाव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त काम करणार नाही अशी भूमिका स्वयंसेविकांनी घेतली. त्यामुळे ही मोहीमच अडचणीत आली आहे.

आता स्वयंसेविकांची अनुपस्थिती लावून त्यांना महिन्याचे मानधन न देण्याची भूमिका पालिका प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याची कुणकुण त्यांना लागली आहे. त्यामुळे स्वयंसेविका प्रचंड संतापल्या आहेत. आता किमान वेतन मिळेपर्यंत कोणतेच काम न करता बेमुदत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात त्या आहेत. त्यामुळे पालिकेची मुंबईमधील आरोग्य सेवाच नव्हे तर पुढील महिन्यात केंद्र सरकारतर्फे शाळांमध्ये राबविण्यात येणारी ‘एमआर’ लसीकरण मोहीमही अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

आश्वासन विरले?

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बैठकही घेतली, मात्र या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आरोग्य स्वयंसेविकांमध्ये असंतोष धगधगू लागला आहे.