मुंबई शहर बंद करायला लावलेल्या पहिल्या पावसाचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून, शहरावर लेप्टोच्या साथीचे सावट पसरले आहे. अवघ्या सात दिवसांत बारा जणांचा बळी गेला आहे. या साथीचे रुग्ण प्रामुख्याने गोरेगाव ते दहिसर भागात आढळले आहेत. लेप्टोच्या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर आजाराची लक्षणे दिसण्यासाठी ३ ते २१ दिवसांचा कालावधी लागत असल्याने आणखी काही दिवस लेप्टोचे रुग्ण आढळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवडय़ाभरात लेप्टोस्पायरोसिसचे २१ रुग्ण आढळले असून, एक वगळता बाकी सर्व मृत्यू गोरेगाव ते दहिसर पट्टय़ात झाले आहेत. त्यामुळे मलेरिया व डेंग्यूच्या नियंत्रणासाठी कंबर कसलेल्या पालिका अधिकाऱ्यांना आता लेप्टो व ही साथ पसरवणाऱ्या उंदरांकडे लक्ष केंद्रित करणे भाग पडले आहे. पुराच्या पाण्यात जमिनीखालील उंदीर मरण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जोरदार पाऊस पडल्यावर लेप्टोचे रुग्ण वाढल्याचे दिसते, असे निरीक्षण आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. मात्र गेल्या चार वर्षांच्या तुलनेत या वेळी अवघ्या आठवडाभरात लेप्टोच्या मृत्यूंची संख्या तिप्पट आहे. लेप्टोस्पायरोसिसच्या बारापैकी चौघे दहिसर, तीन कांदिवली, चार मालाड व एक मृत्यू वरळी येथील आहे. यात १३ वर्षांखालील एका मुलाचा, १३ ते ३० वयोगटांतील सात जणांचा, ३१ ते ४५ मधील तिघांचा तर त्या पुढील वयोगटातील एकाचा समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) संजय देशमुख यांनी दिली.
लेप्टो झालेल्या बारापैकी सात जणांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत झाला. दोघांचा मृत्यू एक दिवसानंतर तर ३ मृत्यू तीन दिवसानंतर झाले. यातील बहुतांश रुग्ण ताप आल्यानंतर खासगी डॉक्टरांकडे गेले होते. आजाराची पुढची पातळी गाठल्यानंतर रुग्णालयात आल्याने mp011त्यांच्यावर उपचार करता आले नाहीत, असे स्पष्टीकरण पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिले. लेप्टोच्या जिवाणूंनी शरीरात प्रवेश केल्यावर लक्षणे दिसण्यासाठी तीन आठवडय़ांपर्यंतचा कालावधी लागतो. १९-२० जूनच्या पुरातील लेप्टोचा प्रसार आता दिसू लागला आहे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने रुग्ण आढळलेल्या परिसरातील सर्व घरांची तपासणी सुरू केली असून तापाच्या रुग्णांना उपचार दिले आहेत.

लेप्टो का होतो?
कुत्रे, उंदीर अशा लेप्टोचा संसर्ग झालेल्या प्राण्यांची विष्ठा मिसळलेल्या पाण्यातून चालताना पायाला जखम झाली असेल, तर त्या जखमेतून लेप्टोस्पायरोसिसचे विषाणू शरीरात प्रवेश करतात. या आजाराची लक्षणे दिसण्यास ३ ते २१ दिवसांचा कालावधी लागतो.

उंदीर मारण्यासाठी कंत्राट देणार
उंदीर मारण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी असले तरी सध्याची लेप्टोची साथ पाहता पालिकेने उंदीर मारण्यासाठी बाहेर कंत्राट देण्याचे ठरवले आहे, मात्र कंत्राट नेमके कशा स्वरूपात असेल. प्रत्येक मेलेल्या उंदरामागे पैसे दिले जातील की प्रत्येक परिसरासाठी कंत्राट दिले जाईल, याचा निर्णय होणे बाकी आहे.

लक्षणे :  तीव्र ताप हे लेप्टोचे लक्षण आहे. मात्र काही वेळा ताप येत नाही. लेप्टोमध्ये असहय़ डोकेदुखी, अंगदुखी होऊ शकते. पोटही दुखते. यापैकी कोणतेही लक्षण दिसत असल्यास तातडीने डॉक्टरकडे जावे.