रुग्णांच्या संख्येतही वाढ

मुंबई : शहरात लेप्टोस्पायरोसिसमुळे १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात लेप्टोमुळे झालेला पहिला मृत्यू आहे. लेप्टोच्या रुग्णांची संख्या ही ऑगस्टच्या तुलनेत काही अंशी वाढली आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. या पाण्यातून चालण्यामुळे संसर्ग झाल्याने अनेकांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली. माटुंगा येथील १६ वर्षांच्या मुलाला ३१ ऑगस्टला तापासह श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले. तपासणीमध्ये त्याला लेप्टो असल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान ४ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. ऑगस्टमध्ये पडलेल्या सर्वाधिक पावसानंतर शहरातील लेप्टोच्या रुग्णांची संख्या जुलैच्या तुलनेत १४ वरून थेट ४५वर पोहोचली होती. सप्टेंबरमध्येही जोरदार पाऊस पडल्याने मुंबईत पाणी साचले होते. परिणामी लेप्टोच्या रुग्णांची संख्या या महिन्यात वाढून ५४वर गेली आहे.

सप्टेंबरमध्ये मलेरियांच्या रुग्णांची संख्या ऑगस्टच्या तुलनेत ७० टक्क्यांनी कमी करण्यात पालिकेला काही प्रमाणात यश आले आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या १,१३७ पर्यंत पोहोचली होती. या वर्षी जुलैमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली. मलेरिया विभागातील सर्व कर्मचारी करोनाच्या कामात गुंतल्याने पसरलेली मलेरियाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने कंबर कसल्याने गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये नोंदल्या गेलेल्या मलेरियाच्या रुग्णांपेक्षा यावर्षी रुग्णांची संख्या घटली आहे.

डेंग्यू, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रो, काविळ या पावसाळ्यातील अन्य आजारांचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कमी आढळले आहे.