यंदाच्या पावसाळय़ातील बळींची संख्या सहावर; गेल्या पंधरवडय़ात २१ जणांना लागण

सप्टेंबर अर्धा उलटल्यानंतरही मुक्कामी असलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचून साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यातही लेप्टोस्पायरोसिसची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या पंधरा दिवसांत लेप्टोचे २१ रुग्ण आढळले असून यंदाच्या पावसाळय़ात या आजाराने दगावलेल्यांची संख्या सहावर गेली आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाइन फ्लूचे प्रमाणही वाढत असल्याचे पालिकेच्या आरोग्य अहवालातून निदर्शनास आले आहे.

सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचा जोर कायम असतो आणि सप्टेंबरमध्ये तो कमी होतो. त्यामुळे लेप्टोचे रुग्णही तुलनेने सप्टेंबर महिन्यात कमी आढळतात. परंतु या वर्षी सप्टेंबरमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. परिणामी शहरात लेप्टोचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरला. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्येच २१ जणांना लेप्टाची बाधा झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एकूण २७ जणांना लेप्टोची लागण झाली होती, तर दोघांचा मृत्यू झाला होता.

‘स्वाइन फ्लू’चा जोर

पावसाच्या बदलत्या वातावरणामुळे शहरातील स्वाइन फ्लूचा जोरही वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये सहा फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी या काळात केवळ एका रुग्णाला फ्लूची बाधा झाल्याची नोंद आहे. स्वाइन फ्लूने या पावसाळ्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सततच्या पावसामुळे अजून डेंग्यूचे प्रमाण म्हणावे तितके वाढले नसले तरी पाऊस थांबल्यानंतर डेंग्यूचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. १ ते १५ सप्टेंबरदरम्यान डेंग्यू (१०४), मलेरिया (३१९), गॅस्ट्रो (१९३), कावीळ (५७)चे रुग्ण आढळले आहेत. तर १५३६ डेंग्यू संशयित रुग्ण पालिका रुग्णालयांत दाखल झाले आहेत.

पालिकेचे आवाहन

साठलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी उंदीर आणि रस्त्यावरील कुत्रे अधिक प्रमाणात येत असून त्यांच्यामुळे लेप्टोचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो. साचलेल्या पाण्यातून चाललेल्या व्यक्तींनी तातडीने लेप्टोची प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.