लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो १ ची सेवा सुरू झाल्यानंतर महिनाभरात प्रवासी संख्या तिपटीपेक्षा अधिक झाली असली तरी लोकल प्रवास सर्वासाठी खुला नसल्याने अद्याप अपेक्षित प्रवासी संख्या गाठता आलेली नाही.

सात महिन्यांनंतर १९ ऑक्टोबरपासून घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो १ची सेवा सुरू झाल्यावर आठवडय़ाभरातच प्रवासी संख्या दुपटीवर पोहोचली. करोनापूर्व काळातच सर्वसाधारणपणे एका मेट्रो रेल्वेगाडीतून एका वेळी सुमारे १३५० प्रवासी प्रवास करायचे; पण करोनाच्या पाश्र्वभूमीवर बैठकव्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे सध्या एका वेळी केवळ ३६० प्रवासी प्रवास करू शकतात. मेट्रो १ मार्गिकेवर दिवसाला २०० फेऱ्या होत असून सुमारे ७२ हजार प्रवासी अपेक्षित आहेत. ही संख्या किमान ६० हजारांपेक्षा अधिक होण्याची अपेक्षा मेट्रो १ प्रशासनास होती. मात्र अद्यापि दिवसाला केवळ ४५ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचे मेट्रो १ च्या प्रवक्त्याने सांगितले.

महिलांना उपनगरी सेवेने ठरावीक वेळेत प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर प्रवासी संख्येत काही प्रमाणात वाढ झाली. मात्र अद्याप सर्वानाच उपनगरी रेल्वेने प्रवासाची परवानगी नाही. करोनापूर्व काळात दिवसाला सुमारे चार लाख प्रवासी मेट्रोचा वापर करायचे. त्यापैकी दोन लाख प्रवासी घाटकोपर आणि अंधेरी स्थानकातून प्रवास करायचे. यापैकी ८० टक्के प्रवासी हे उपनगरी रेल्वेचा वापर करून मग मेट्रो स्थानकात पोहोचायचे, असे मेट्रो-१ च्या प्रवक्त्याने सांगितले.

कल्याण-डोंबिवली, पनवेल, वसई, विरार अशा लांबून येणाऱ्यांना अंधेरी-घाटकोपर पट्टय़ात जाण्यासाठी मेट्रोचा वापर करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: कल्याण-डोंबिवली, पनवेल येथून येणाऱ्या प्रवाशांना पूर्व द्रुतगती मार्ग, घाटकोपर आगार (पूर्व) येथून मेट्रो स्थानक गाठण्यासाठी दोन ते तीन वेळा वाहन बदलावे लागते, तर खासगी वाहनाने येणाऱ्यांना घाटकोपर येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही.

मोनोचा प्रतिसाद मर्यादितच

मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक ही मोनो रेल्वे सेवा सुरू झाली. पहिल्या आठवडय़ानंतर दिवसाला केवळ ५५० प्रवासीच याचा उपयोग करायचे, त्यात महिनाभरात दीड हजाराची वाढ झाली. सध्या या मार्गावर दिवसाला दोन हजारपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. या मार्गिकेवर केवळ दोनच रेल्वेगाडय़ा कार्यरत असल्याने दोन फेऱ्यांमधील वारंवारिता ३० मिनिटांची आहे. तसेच ही सेवा उपनगरी रेल्वे स्थानकास जोडलेली नाही आणि व्यापारी केंद्रांचीदेखील कमतरता आहे. दिवसाला साधारणपणे तीन हजार प्रवासी असतील तरच संचालनाचा खर्च निघू शकतो.