‘दुकानदारी’ टाळून महाविद्यालयांतच प्रवेश परीक्षांसाठी शिकवणी
खासगी कोचिंग क्लासेसशी संधान बांधून आर्थिक कमाई करण्याचा ‘शॉर्टकट’ मार्ग मुंबई-पुण्यातील महाविद्यालये एकीकडे अवलंबत असताना लातूर, नांदेडमधील महाविद्यालयांनी ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर आपल्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई-मेन्स, अ‍ॅडव्हान्स या परीक्षांसाठी तयार करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. विद्यार्थ्यांकडून जादा पैसे न उकळता माफक दरांत त्यांना प्रवेश परीक्षांसाठी सज्ज करता येऊ शकते, असा धडाच ‘मराठवाडा पॅटर्न’मधून मिळतो आहे.
क्लासमध्ये चढय़ा दराने विकला जाणारा ‘माल’ ना नफा, ना तोटा तत्त्वावर आपणच उपलब्ध करून दिला तर, या विचाराने ही महाविद्यालये बाहेरचे शिक्षक नेमून विद्यार्थ्यांना क्लासमध्ये जाण्यापासून रोखण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाली आहेत. ‘लातूर पॅटर्न’मुळे प्रकाशझोतात आलेले लातूरचे राजश्री शाहू महाविद्यालय यात आघाडीवर आहे. या विद्यार्थ्यांची तयारी करवून घेण्याचे काम आतापर्यंत ही महाविद्यालये आपल्या शिक्षकांच्या मदतीने करीत होती. पण राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमुळे विस्तारलेला अभ्यासक्रम, परीक्षेची वाढलेली काठीण्यपातळी यामुळे हे आव्हान अधिक कठीण झाले आहे. पण महाविद्यालयांनी यातून मार्ग काढीत या परीक्षांची तयारी करवून घेण्यात मुरलेल्या हैदराबादच्या शिक्षकांनाच आपल्याकडे पाचारण केले आहे. ‘या आधीही आम्ही बाहेरचे शिक्षक बोलावत होतो, पण ते राज्यातलेच असायचे. नीट, जेईईमुळे आम्हाला आता राज्याबाहेरचे कसलेले शिक्षक नेमणे भाग आहे. कोटय़ाच्या शिक्षकांचा पगार आम्हाला परवडणे शक्य नाही, पण हैदराबादच्या चार शिक्षकांना नेमून आम्ही ही उणीव भरून काढली आहे,’ असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. जाधव यांनी सांगितले.
शाहूच्या बरोबरीने नांदेडचे यशवंत महाविद्यालय, अकोल्याचे आरएलटी ही काही विदर्भ मराठवाडय़ातील हाताच्या बोटावर मोजता येतील अशी महाविद्यालये गेली अनेक वर्षे आपल्या विद्यार्थ्यांची दहावी-बारावीबरोबरच प्रवेश परीक्षांसाठीही तयारी करून घेत आहेत. त्यासाठी जादाचे वर्ग, शिकवण्या, मार्गदर्शन, चाचण्या हे सगळे ही महाविद्यालये केवळ स्टेशनरीचा नाममात्र खर्च घेऊन करीत आली आहेत. याचा सकारात्मक परिणाम एमएचटी-सीईटीच्या व बारावीच्या निकालांमध्ये दिसून येत असे. शाहूचे दरवर्षी तब्बल १२० ते १७० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश मिळविण्यात यशस्वी होतात. तर यशवंतचे ८० ते १०० व आरएलटीचे ६० ते ८० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशात वरच्या यादीत असतात.