रसिका मुळ्ये

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या उपक्रम उत्साहाने शिक्षक बेजार झाले आहेत. तुळशीसमोर दिवा लावण्यापासून ते रोज सामान्यज्ञानाच्या परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेले गृहपाठ आणि शिक्षकांसाठी व्हिडिओ तयार करण्याचे बंधन असे विविध उपक्रम घेण्याची स्पर्धाच विभागातील अधिकाऱ्यांमध्ये लागली आहे.

सर्वाधिक कोणता जिल्हा उपक्रमशील अशी स्पर्धा असावी असे वातावरण शिक्षण विभागात सध्या आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने ‘शाळा बंद – परंतु अभ्यास सुरू’ अशी मोहिम सुरू केली. त्यामध्ये शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून रोज काही पाठ देण्यात येतात. शिक्षकांनी ते विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवणे अपेक्षित आहे.

प्रत्येक शिक्षकाने पाठाची ध्वनीचित्रफीत करून पाठवण्याचे एका तालुक्यात बंधनकारक करण्यात आले आहे. तालुका, जिल्हा, राज्य अशा सर्व स्तरावरील उपक्रम राबवणे, त्याचे अहवाल पाठवणे, अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाच्या कार्यशाळा, निकाल आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लावलेली नाकाबंदीची कामे अशी जंत्री शिक्षकांच्या मागे लागली आहे. ‘आपला तालुका किंवा जिल्हा उपक्रमांत मागे राहता कमा नये,’ अशा अधिकाऱ्यांच्या तंबीला सामोरे जात शिक्षक अहवाल भरत आहेत.

होतेय काय? अवांतर वाचनासाठीचे पुस्तक, घरी करता येईल असा एखादा उपक्रम किंवा खेळ, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोज एका पाठासाठी पूरक मजकूर, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मजकूर परिषद पाठवते. अगदी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या पातळीवर ऑनलाईन अभ्यास करून घेण्यासाठीचे उपक्रम शिक्षकांवर लादले जात आहेत. आपला तालुका किंवा जिल्हा नवे उपक्रम राबवण्यात मागे राहू नये, याची स्पर्धाच विभागात सुरू झाली आहे. ऑनलाईन उपक्रम राबवा आणि अहवाल पाठवा हा ससेमिरा शिक्षकांच्या मागे कायम आहे.

गंभीर आणि गमतीदार..

* एका जिल्ह्य़ाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाच्या चाचण्या घेण्याचे आदेश दिले आहेत.

* एका जिल्ह्य़ात सुट्टीत गृहपाठ म्हणून तुळशीसमोर दिवा लावता येणे, सडा घालणे, रांगोळी काढणे, साडी किंवा धोतर नेसता येणे अशा उपक्रमांचे महिन्याभराचे वेळापत्रक दिले आहे.

* टाळेबंदीच्या काळात बँकेत जाऊन धनादेश भरण्यास शिकण्याचाही गृहपाठ विद्यार्थ्यांना दिला आहे.

शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांना उपक्रम घेण्याच्या कोणत्याही सूचना दिलेल्या  नाहीत. अधिकारी त्यांच्या स्तरावर उपक्रम घेत आहेत. किंबहुना आपल्या जिल्ह्य़ापुरते स्वतंत्र उपक्रम राबवण्याऐवजी महाराष्ट राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे कल्पना मांडाव्यात, असे आवाहन अधिकाऱ्यांना केले होते.

– दिनकर पाटील, संचालक, महाराष्ट राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद