बदललेल्या राजकीय परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाला काही भवितव्य राहिले नाही, या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या विधानावर वेगवेगळ्या गटा-तटातील कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. रिपब्लिकन पक्ष पुन्हा नव्याने व हिमतीने उभा करावा, अशी साद आठवले यांना घालण्यात येत आहे. गटातटाच्या राजकराणामुळे पक्षाला अशी अवस्था प्राप्त झाली आहे, अशा परखड प्रतिक्रियाही समाजमाघ्यमावर व्यक्त होत आहेत.

गेली तीस वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणावर कमी-अधिक प्रमाणात प्रभाव टाकणाऱ्या रामदास आठवले यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीतीचे वास्तववादी विश्लेषण करताना, पक्षाला भवितव्य नाही, असे परखड मत व्यक्त केले. आठवले यांच्यासारख्या लढाऊ नेत्याने असे मत व्यक्त केल्याबद्दल समाजमाध्यमावरही त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी, राजकारणात चढ- उतार येत असतात, सर्वच पक्षांच्या बाबतीत असे घडते, त्यामुळे हाताश होण्याचे काही कारण नाही, असे म्हटले आहे.

एकच रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे या नेत्यांनी त्यासाठी पुढे यावे, आपण मागच्या स्थानावर राहायला तयार आहे, असे डॉ. गवई म्हणाले. देशभर पक्ष वाढत आहे, अशा वेळी पक्षाचे अध्यक्ष आठवले रिपब्लिकन पक्षाला भवितव्य राहिले नाही, असे कसे विधान करू शकतात, असा प्रश्न रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दयाळ बहादुरे यांनी उपस्थित केला.

रिपब्लिकन पक्षाचे (सुधारणावादी) अध्यक्ष समाधान नावकर म्हणाले की, प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले हे दोन नेते चळवळीचे कर्तेधर्ते आहेत. आठवले यांनी वस्तुस्थिती मांडली असली तरी, असे हताश होण्याचे कारण नाही. पक्षाला उभारी देण्याचे राजकारण केले पाहिजे, तर लोक पुन्हा पक्षाकडे येतील. दलित पॅंथर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व कवी खंडू आडांगळे यांनी आठवले यांच्या वक्तव्याने आपण अस्वस्थ झाल्याचे सांगितले. राजकारणाव्यतिरिक्त नव्या पिढीला प्रगतिपथावर नेण्यासाठी चळवळीने काम के ले पाहिजे, असे ते म्हणाले. गटातटाच्या राजकरणामुळे रिपब्लिकन पक्षाची अशी अवस्था झाली आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून, डॉ. बाबासासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील एकच असा बलवान रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी  सर्वानी पुढे आले पाहिजे, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमावर व्यक्त होत आहेत.