प्रसाद रावकर

मुंबईमध्ये पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू आदी साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिकेच्या कीटकनाशक विभागाने कंबर कसली आहे.

डासप्रतिबंध मोहिमेत लोकसहभाग वाढावा या उद्देशाने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. डासांची उत्पत्तिस्थाने निर्माण होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत मुंबईमधील समस्त सोसायटय़ांना पालिकेने पत्र पाठवण्यास सुरुवात केली आहे. प्रतिबंधात्मक उपाय न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा आणि न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही या पत्रामध्ये देण्यात आला आहे.

पालिकेच्या कीटकनाशक विभागातर्फे वर्षभर डासप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असतात. पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जानेवारीपासून डासांच्या उत्पत्तिस्थानांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात येते. मात्र उच्चभ्रू वस्त्यांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येतो. त्यामुळे अशा ठिकाणी डासांमुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेत कीटकनाशक विभागाने मुंबईमधील सर्वच सोसायटय़ांना पत्र पाठवून डासप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची सूचना देण्याचा निर्णय घेतला आहे. काही सोसायटय़ांना ही पत्रे पाठविण्यातही आली आहेत.

डासप्रतिबंधात्मक उपाययोजना न करणाऱ्या सोसायटय़ांवर १० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. तसेच उपाययोजना करेपर्यंत प्रतिदिन दोन हजार रुपये दंडही आकारण्यात येणार आहे. कोणत्याही उपाययोजना न करता साथीच्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल करण्याचा इशारा पत्रामध्ये देण्यात आला आहे.

डासप्रतिबंध मोहिमेसाठी लोकसहभागाची नितांत गरज आहे. पालिकेने सुचविलेल्या उपाययोजना नागरिकांनी आपल्या घरात केल्या तरी हिवताप, मलेरियाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यास मदत होऊ शकेल.

– राजन नारिंग्रेकर,  कीटकनाशक अधिकारी