कर्ज फेडण्यासाठी स्वत:च्या मालकीची जमीन विकण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करून तिची हत्या करणाऱ्या ३० वर्षांच्या तरुणाला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले.
पोलिसांनी या तरुणाविरुद्ध ठोस पुरावे सादर केले असून कनिष्ठ न्यायालयाने त्याला शिक्षा सुनाविण्यात कोणतीही चूक केलेली नसल्याचे नमूद करीत न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठाने त्याची जन्मठेप कायम केली. बाळासाहेब गुजाले असे या आरोपीचे नाव असून त्याने २४ मे २००५ रोजी पत्नी शोभा हिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करीत तिचा खून केला होता. त्याला कनिष्ठ न्यायालयाने दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
पोलिसांच्या दाव्यानुसार, गुजाले याच्या डोक्यावर कर्ज होते. ते फेडण्यासाठी तो शोभाला तिच्या नावे असलेली जमीन विकण्यास सांगत होता. मात्र तिने ती विकण्यास नकार दिल्यानंतर गुजाले याने तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. गुजाले हा सांगली येथील एका दुग्धालयातील प्रयोगशाळेत रायानिक म्हणून नोकरीला होता, तर शोभाचा स्वत:चा पार्लरचा व्यवसाय होता. घटनेच्या दिवशी त्याने एका स्थानिक दुकानातून नायट्रिक अ‍ॅसिड खरेदी केले आणि तो शोभाच्या पार्लरमध्ये गेला. शोभाच्या नावे असलेली जमीन विकण्यावरून तेथे त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर गुजाले याने स्वत:कडील अ‍ॅसिड काढून ते शोभावर फेकले. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे झालेल्या गंभीर जखमांमुळे शोभाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी पार्लरमध्ये आलेली एक महिला आणि तिची लहान मुलगी यासुद्धा या अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झाल्या. डिसेंबर २००९ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने गुजाले याला दोषी धरत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गुजाले दुग्धालयात काम करीत होता. दुग्धालय साफ करण्यासाठी अ‍ॅसिडचा वापर करतात. त्यामुळे नायट्रिक अ‍ॅसिड किती हानीकारक आहे याचीही त्याला कल्पना असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले.