मुंबई : सावत्र, गतिमंद मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या महिलेला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उपाशी ठेवणे, चटके देणे, मारहाण करणे इतक्यावरच न थांबता अणकुचीदार पिना घुसवून मुलीचे दोन्ही डोळे  निकामी करेपर्यंत प्रतिभाची मजल पोहोचली. तिने या मुलीवर केलेले अमानुष अत्याचार भांडुप पोलिसांनी सत्र न्यायालयात पुराव्यांनीशी सिद्ध केले.

३० नोव्हेंबर २०१५ रोजी सहा वर्षांच्या पायलचा मृत्यू झाला. भांडुप पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला तेव्हा शरीरावर असंख्य जखमा, चटके दिल्याच्या खुणा आढळल्या. पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांनी या मुलीचे डोळे निकामी करण्यात आले आहेत. मुलीला जागोजागी चटके दिले आहेत. बाह्य़ व अंतर्गत अनेक जखमा, व्रण आढळले आहेत, असे अहवालात नमूद केले. तसेच मुलीवरील या अत्याचारांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट केले. त्यावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला.

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोवे, उपनिरीक्षक सुहास रहाणे, हवालदार सूर्यवंशी, कदम, शिपाई भोये, महिला पोलीस शिपाई गागरे या पथकाने तपास सुरू केला. पायल सावत्र आणि गतिमंद असल्याने तिला अनाथाश्रमात किंवा अन्यत्र न्या, अशी मागणी प्रतिभाने पती राजेशकडे लावून धरली होती. मात्र राजेश त्यास तयार नसल्याने प्रतिभा पायलवर अमानुष अत्याचार करू लागली, अशी माहिती चौकशीतून पुढे आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रतिभाने गुन्हा कबूल केला. पायलच्या हत्येसाठी वापर झालेल्या अणकुचीदार पिनांसह घराच्या भिंतीवरील रक्ताचे नमुने हस्तगत केले. न्यायालयात राजेशने साक्ष फिरवली. मात्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अहवाल, शवचिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष आणि अन्य साक्षीदारांचे जबाब याआधारे न्यायालयाने प्रतिभाला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.