मुंब्य्रात इमारत पडताच ठाण्यातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या वर्तक नगर येथील भाडेतत्त्वावरील घर योजनेतील इमारतींमध्ये स्थलांतरित करण्याचा आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला खरा पण पावसाळा सुरू होऊन ठिकठिकाणी इमारती पडण्यास सुरुवात होऊनही प्रत्यक्ष पुनर्वसन झालेच नसल्याने ठाण्यातील ५७ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या भाडेतत्त्वावरील घरांच्या योजनेसाठी ठाण्यात वर्तक नगर येथे ‘दोस्ती विहार’ तर मानपाडा येथे ‘दोस्ती इम्पेरिया’ हे दोन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांत प्रत्येकी १४९२ घरे, ३२ दुकाने, चार बालवाडय़ा, चार सांस्कृतिक केंद्र आणि देखभाल  कर्मचाऱ्यांसाठी चार केबिन आहेत.
अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर मे महिन्याच्या अखेपर्यंत वा फार तर जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणे अपेक्षित असते. त्यानुसार ठाण्यातील या इमारतींमधील रहिवाशांचे ‘एमएमआरडीए’च्या घरांमध्ये स्थलांतर आधीच व्हायला हवे होते. त्यासाठी सुमारे १४०० घरांची गरज होती. पण आता निम्मा जून उलटून गेला. मुसळधार पावसामुळे मुंबईपासून भाइंदपर्यंत ठिकठिकाणी इमारती पडण्याच्या वा खचण्याच्या दुर्घटना होत आहेत. तरीही या ५७ इमारतींमधील लोकांचे स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे मुसळधार पावसात जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ तेथील रहिवाशांवर आली आहे. कधीही इमारत पडण्याची भीती आणि स्थलांतर नेमके कधी होणार याची कसलीच शाश्वती नाही, अशा कात्रीत रहिवासी सापडले आहेत.
याबाबत विचारणा केली असता, सरकारच्या आदेशानुसार ठाण्यातील भाडेतत्त्वावरील घरांचा उपयोग रहिवाशांसाठी संक्रमण शिबीर म्हणून करावा. त्यासाठी थेट विकासकाकडून घरांचा ताबा घ्यावा असे पत्र ठाणे महानगरपालिकेला पाठवलेले आहे. या घरांचा ताबा महापालिकेला देण्याचे पत्र विकासकाला देण्यात आले आहे, असे ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी सांगितले. तर या इमारतींकडे येण्या-जाण्यासाठी रस्ता, वापरायला पाणी आदी प्राथमिक सुविधांची तरतूद करायची असून त्याबाबत ठाणे महापालिकेच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे सरकारी कारभारात रहिवाशांचा जीव वेठीला धरला गेल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.