15 December 2018

News Flash

पोलीस नावाचा बापमाणूस

प्रत्येकाचा आनंद जपण्यासाठी माझे बाबा २४ तास ऑन डय़ुटी असतात.

पोलीस नावाचा रिअल हिरो आपल्या आजूबाजूला दिसतो.

नोंदवही
रस्त्यावर दिसणारा खाकी वर्दीतला पोलीस आपल्या संरक्षणासाठी राबत असतो. पण आपण त्याच्यामधल्या ‘माणसा’चा विचार करतो का? त्याच्या सुखदु:खांबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं?

‘कानून के हाथ लंबे होते है’,

‘दुनिया की कोई जगह इतनी दूर नहीं है जहाँ जुर्म के पांव में कानून अपनी फौलादी जंजीर पहना न सके’,

‘आज समाज में उसकी इज्जत होती है, जो कानून को तोडम्ता है, लेकिन मैं उसकी इज्जत करता हूं जो कानून तोडम्नेवालों को तोडम्ता है’,

‘हमारा नाम हमारी पर्सनॅलिटी को शोभा देता है’

असे कित्येक डायलॉग सिनेमामधला पोलीस अधिकारी बोलतो आणि मग अंगावर काटा उभा राहतो. थेटरमध्ये शिटय़ा वाजतात, टाळ्या वाजतात. मग ‘दबंग’मधला चुलबुल पांडे लोकांना आवडतो. कारण तो सलमान खानने साकारलेला असतो. उत्तम साकारलेला असतो; पण पोलिसांसाठी आम्ही शिटय़ा, टाळ्या फक्त थेटरमध्येच वाजवतो जेव्हा तो फक्त मोठय़ा पडद्यावर दिसतो. पण प्रत्यक्षातल्या या हिरोचं काय? हो, पोलीस नावाचा रिअल हिरो आपल्या आजूबाजूला दिसतो. तो सिनेमातल्या हिरोसारखं नाचत नाही. तो लाल दिव्याच्या जाणाऱ्या गाडीला सलाम ठोकण्यासाठी उन्हात उभा असतो. तो सिनेमातल्या पोलिसांसारखं प्रेम करताना दिसत नाही, कारण तो २४ तास ऑन डय़ुटी असतो. पोलीस नावाचा माणूस, खाकी वर्दी काढली तर आपल्यासारखाच दिसतो, आपल्यासारखाच वागतो; पण तरीही आपल्यासारखं सहज जगणं त्याच्या आयुष्यात राहिलेलं नसतं; किंबहुना आपल्यातल्याच काहींमुळे या पोलीस नावाच्या सामान्य माणसाला सहज जगता येत नाही.

‘लोकप्रभा’च्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर लिहिता आलं, मनातलं बोलता आलं; पण आज परळला नाकाबंदीसाठी उभ्या असलेल्या त्या खाकी वर्दीतल्या माणसाला पाहिलं आणि म्हटलं, याच्या मनात काय चाललं असेल? आणि तेवढय़ात कुणी तरी बाइकवाला म्हणाला, ‘‘यांना बाकी काही कामं नाही आहेत का?’’ नजर त्या पोलीस अधिकाऱ्याकडून त्या मुलाकडे गेली. त्याला कदाचित माहीत नसावं, की सकाळपासून हे इथेच डय़ुटी करत आहेत, आपल्या सुरक्षिततेसाठी. ‘पोलीस’, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ज्यांच्यासाठी फक्त ब्रीदवाक्य नसून जगण्याचं तत्त्व झालं आहे. ज्यांच्यासाठी ‘खाकी’ ही फक्त वर्दी नसून कर्तव्य झालं आहे आणि जे आपल्यासाठी फक्त कायद्याचा भाग नसून, आपलं संरक्षण करणारे आपले पालक झाले आहेत.

माझे अनेक मित्र वरळी, नायगाव पोलीस लाइनमध्ये राहतात. कित्येकदा त्यांच्याशी थट्टेने असं बोललं जायचं- ‘तुझं बरं आहे रे, वडील पोलीस आहेत तुझे. पैशाला काही कमी नसणार, सगळं फुकट मिळत असेल.’ आणि मग समोरचा मित्र एवढंच विचारायचा, ‘तुझे बाबा रोज घरी येतात ना?’ आणि मग त्या मित्राच्या या प्रश्नाचा विचार करत बसायचो आम्ही आणि जशी मैत्री वाढत गेली तसं पोलिसांचं आयुष्य कळू लागलं; पण ते समजण्यासाठी आपल्याला पोलिसाच्या मुलाचा जन्म घ्यावा लागेल. आमच्या नाटकाच्या तालमी असायच्या तेव्हा मात्र या मित्राची कारणं ठरलेली असायची. ‘आज बाबा घरी नाही आहेत रे, दोन दिवस बाबा घरी नाही आलेत रे..’ आणि मग मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपोआप कळायला लागलं. आपले बाबा घरी येतात; पण त्यांचे बाबा घरी येतील की नाही, हा प्रश्न रोजच भेडसावत असेल यांना.

२६/११ च्या हल्ल्यानंतर पुन्हा असं होऊ  देऊ नको, असं म्हणून आपण मुंबईकरांनी आपलं स्पिरिट दाखवलं; पण त्याच वेळी कित्येक पोलिसांच्या घरात पणती जळत होती. सगळं काही शांत झालं, त्या वेळी आपण सुटकेचा नि:श्वास सोडला; पण कित्येक आठवणी त्या पोलिसांच्या मनात दडलेल्या असतील ज्या ते कुणाला सांगूही शकत नाहीत याचा प्रत्यय आला तो एका नाटकाची संहिता लिहिताना. त्यासाठी कित्येक पोलिसांना जाऊन भेटलो. प्रत्येकाला बरंच काही सांगावंसं वाटत होतं; पण कोणी सांगू शकत नव्हतं. कारण त्यांना कायद्याचं रक्षण करायचं होतं; पण प्रत्येकाच्या डोळ्यात कित्येक वर्षांनंतरही त्या हल्ल्याची धग दिसत होती. पडद्यावरच्या खाकी वर्दी घातलेल्या हिरोच्या खांद्यावर खोटी गोळी झाडली गेली. खोटं रक्त आलं तरी दचकणाऱ्या आम्हाला, या हल्ल्यानंतर कळलं- आमचं जे रक्षण करतात त्या रिअल हिरोंच्या अंगावरच बुलेटप्रूफ जॅकेट कुठल्या प्रतीचं आहे. त्यापुढे या जॅकेटचं काय झालं कळलं नाही; पण अपेक्षा करतो, सरकारने याचा विचार केला असावा.

माझ्या मित्रांना मी कित्येकदा विचारलं, ‘अरे शिक्षण झाल्यानंतर काय करणार. तू पण पोलिसांत भरती होणार का? पण कित्येकांचं उत्तर नाही असंच आलं. कारण पोलिसांना दिल्या जाणाऱ्या सुविधा. अमुक एवढा पगार येतो. मग त्यातला काही भाग आमच्या पोलीस लाईनच्या घराचं भाडं म्हणून कापलं जातं. मग हातात एवढेच येतात आणि तो हिशेब लावताना खरंच त्या मित्राचा निर्णय योग्य आहे असं वाटू लागतं. काही महिन्यांपूर्वी त्यातल्याच एका मित्राने येऊन सांगितलं. अरे गुड न्यूज आहे. पोलीस लाईनची घरं आत्ता आमच्या नावावर होणार आहेत. त्याचा आनंद दिसत होता. पण नंतर पुढे काही झालंच नाही, होईल असं वाटत नाही असं निराशाजनकच उत्तर आलं. आणि ही सगळी परिस्थिती बघून नंतर विचार आला. मनात एवढं सगळं असताना हे सगळे पोलीस कायद्याचं, आपलं संरक्षण करत असतात. पण आम्ही त्यांना कधी माणूस, मित्र म्हणून बघतच नाही. एखादा पोलीस आपल्याशी कसा वागला यावरून सगळे पोलीस असेच असतात असा आपण निष्कर्ष लावतो. पण असं वाटणाऱ्यांनी, ज्याचे वडील पोलीस आहेत अशा मित्राच्या घरी जावं. अगदी तुमच्या आमच्या वडिलांसारखा माणूस दिसेल. तो माणूस मित्र म्हणून तुमची चौकशी करेल. तुमच्याकडे त्याच्या मुलाच्या तक्रारी करेल आणि मग तुम्हीच त्या मित्राला म्हणाल, तुझे बाबा पोलीस वाटत नाहीत रे. अशा माझ्या कित्येक मित्रांच्या घरी मी गेलोय. त्या पोलीस लाईनमध्ये गेलोय. पोलीस लाइन हेच एक मोठं कुटुंब आहे. घरातला पुरुष डय़ुटीवर असताना ही कुटुंबं एकमेकांना आधार देतात आणि अडीअडचणीच्या वेळी धावून येतात. अजूनही या पोलीस लाइनमध्ये एका घरातली साखरेची वाटी दुसऱ्या घरात जाते. आणि आजही घरातली स्त्री डय़ुटीवर असली तरी तिच्या तान्ह्या मुलाला मजल्यावरची प्रत्येक मावशी आईसारखी असते. मग दोन घरांच्यामध्ये भिंती असल्या तरी मनातली भिंत बाजूला सारून पोलीस लाइन एक कुटुंब होतं.

पण आज माझ्या त्या प्रत्येक मित्राला, त्याच्या पोलीस असणाऱ्या बाबांना काहीतरी सांगावंसं वाटतंय. म्हणून त्या सगळ्याच मित्रांच्या वतीने मी हे पत्र त्या पोलीस वडिलांना लिहितोय.

प्रिय बाबा,

आज तुमच्यासाठी पहिल्यांदा पत्र लिहितोय. कदाचित माझ्यासारख्या कित्येक मुलांना त्यांच्या बाबांना पत्र लिहायचं असेल. तर हे पत्र त्या सगळ्या बाबांसाठी.

बाबा जेव्हापासून कळायला लागलं, तेव्हा मला खूप अभिमान वाटायचं. तुमच्या अंगावरची वर्दी पाहून. समोर सॅल्यूट केला नसेल तुम्हाला, पण मनातल्या मनात एक सलाम ठोकायचो तुम्हाला. एक पोलीस म्हणून.

पण पोलीस असलेले बाबा तुम्ही घरी खूप कमी वेळ देता. तुम्हाला मी कितवीला आहे हेसुद्धा कित्येकदा सांगायला लागतं. मला बरं नसतानाही तुम्ही माझ्यासोबत थांबला नाहीत. पण काळजीनं आईला १० वेळा फोन करून माझ्याबद्दल विचारताना कित्येकदा ऐकलं आहे मी. पण तुम्ही घरात असणं क्वचितच, मग हळूहळू कुठेतरी वाटायला लागलं, इतर बाबांसारखं माझ्या बाबांनी मला वेळ द्यावा. सणाच्या दिवशी आमच्यासोबत थांबावं आणि सण साजरा करावा. पण मला सणही साजरे करावेसे वाटत नाही हल्ली. गावी जायचं म्हटलं तर ‘नाही यायला मिळणार गावी. तुम्हाला गाडीत बसवून देतो. तुम्ही जा.’ असं म्हणायचात. त्यामुळेच नेहमीच बाबांमधले पोलीस दिसले. खाकीतले ‘बाबा’ मला कधी वेळ देणार? असा प्रश्न पडला.

पण गणपतीच्या दिवसात, गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी तुम्हाला बंदोबस्त करताना पाहिलं. आणि बघतच राहिलो. आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. माझे बाबा सण साजरे करत नाहीत. म्हणून आज बाकीचा प्रत्येक जण प्रत्येक सण जल्लोषात साजरा करू शकतो. आज माझे बाबा घरी उशिरा घरी येतात. म्हणून बाकीचा प्रत्येक जण आपल्या घरात सुखरूप वेळेवर पोहोचलेला असतो. आज माझे मित्र त्यांच्या बाबांसोबत एन्जॉय करत असतात. पण प्रत्येकाचा आनंद जपण्यासाठी माझे बाबा २४ तास ऑन डय़ुटी असतात आणि त्या वेळी मला कळलं. माझे बाबा हे फक्त माझे बाबा नाहीत तर पोलीस नावाचा बाप माणूस आहे.

बाबा, हॅट्स ऑफ यू..!

प्रल्हाद कुडतरकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

First Published on March 14, 2018 11:57 am

Web Title: life of police and his family lokprabha article