दिवा येथील एका खासगी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या २३ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा डॉ. विल्यम जेकब वर्गी याला शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एम. नंदेश्वर यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
दिवा परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय मुलीला मलेरिया झाला होता. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालय नवीन असल्याने तिथे अन्य रुग्ण नव्हते. ती युवती रात्री जनरल वॉर्डमध्ये एकटीच झोपली होती. त्यावेळी रुग्णालयात डॉ. विल्यमसह दोन डॉक्टर आणि एक आया होती. दरम्यान, विल्यम याने त्या युवतीला सलाईनमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला व सर्व पुरावे त्याने नष्ट केले.  हा प्रकार दुसरा डॉक्टर आणि आयाने पाहिला होता. या दोघांनाही त्याने दम दिला होता. २६ एप्रिल २०१३ रोजी ही घटना घडली होती.  
दुरुस्तीसाठी गेलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू
मुंबई: हार्बर मार्गावर चालणाऱ्या व वयोमर्यादा ओलांडलेल्या एका गाडीच्या डब्यात झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. बिघाड दुरुस्ती झाल्यानंतर गाडीचा पेंटोग्राफ आणि ओव्हरहेड वायर जोडले गेले आहेत का, हे बघण्यासाठी हा कर्मचारी दारातून वर डोकावत होता. तेवढय़ात गाडी सुरू झाली आणि त्याचे डोके खांबावर आपटले. त्यामुळे तो खाली पडल्याने रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निदान भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांनी केले.  वांद्रय़ाला जाणारी गाडी रे रोड स्थानकात शिरताना या गाडीच्या मधल्या डब्यात बिघाड असल्याचे जाणवले होते. भोसले नावाचे फिटर गाडीतच होते आणि त्यांच्या साथीला एम. ए. शेख हा फिटर आला. दुरुस्तीसाठी त्यांनी पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरपासून थोडा खाली केला होता.