अमर सदाशिव शैला

जन्मापासूनच रक्ताच्या नात्यांना मुकलेल्या अनाथांचा जीवनसंघर्ष करोनाकाळात अधिकच बिकट बनला आहे. टाळेबंदीमुळे रोजगार मिळविणे अवघड बनल्याने अनाथालयातून बाहेर पडून आयुष्याला आकार देण्याची अनेकांची स्वप्ने धुळीस मिळत आहेत. कित्येक मुलांचा जगण्याचा संघर्ष तीव्र झाला असून, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करणाऱ्या या तरुणांना सरकारने आधार द्यावा, अशी मागणी होत आहे.

महिला व बालविकास विभागाअंतर्गत चालणाऱ्या बालगृहात अनाथ मुलांना १८ वर्षांपर्यंतच ठेवले जाते. त्यानंतर यातील काही मुले २१ वयापर्यंत अनुरक्षणगृहात राहू शकतात. अनुरक्षणगृहात या तरुणांना निवास, जेवण आणि शिक्षणासाठी सरकारी मदत मिळते. मात्र, त्यातील अनेकजण अनुरक्षणगृहात दाखल होत नाहीत. त्यामुळे या मुलांचा सरकारी यंत्रणेशी संपर्क तुटतो. काहीजण हॉटेलमध्ये काम करतात, तर काही मिळेल  त्या मार्गाने उदरनिर्वाह करतात. मात्र, करोनाकाळात त्यांची स्थिती बिकट बनली आहे.

मुंबईतील एका केक शॉपमधील कामाचा आधार असलेली २४ वर्षीय तरुणी वयाच्या १८ व्या वर्षी बालगृहातून बाहेर पडली. या तरुणीने आयटीआय आणि फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले. केक शॉपमध्ये १० हजार रुपये मोबदला मिळायचा. आता तिची नोकरी गेली. ती ज्या मुलींबरोबर राहत होती, त्यांच्यावरही हलाखीची वेळ आल्याने त्यातील अनेकजणी खोली सोडून गेल्या. तिला एकटीला भाडे भरणे अशक्य असल्याने या तरुणीला सामाजिक संस्थेकडे आश्रयास जावे लागले. मुंबईहून ही तरुणी पुण्यातील संस्थेमध्ये दाखल झाली. तेथून ती दापोली येथील संस्थेत जाणार आहे.

अन्य एका २५ वर्षीय तरुणीने वकिलीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले. टाळेबंदीआधी ही तरूणी एका वकिलाच्या हाताखाली कामाला होती. तेथील तुटपुंज्या पगारात भागवून ती पीएचडीची तयारी करत होती. तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्याने समाजकल्याण वसतिगृहात ती राहत होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वसतिगृह प्रशासनाने खोली सोडण्यास सांगितले. त्यामुळे या तरुणीने पुन्हा पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पीएचडीची तयारी सुरू ठेवली. मात्र, टाळेबंदीमध्ये वसतिगृहे बंद झाली. अनेक विनवण्या करून तिला एका वसतिगृहाने निवारा दिला. मात्र अन्नासाठी तिची परवड सुरू आहे.

कोल्हापुरात २० ते २५ अनाथ मुले अडकून पडली आहेत. त्यातील बहुतांश मुले हॉटेलमध्ये कामाला आहेत. तिथेच या मुलांचे जेवण होत असे. मात्र, हॉटेल बंद असल्याने या मुलांचा रोजगार गेला. त्यांनी जेवणासाठी संस्थेला संपर्क साधला. आता सामाजिक संस्था या मुलांच्या जेवणाचे आणि पुढील महिन्याच्या खोली भाड्यासाठी तजवीज करत आहेत.

समस्याग्रस्तांत वाढ …

सनाथ वेल्फेअर संस्थेकडे अशी मुले आपली कैफियत मांडतात. सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे भागातील अनेक तरुण-तरुणींनी संपर्क साधून मदतीची मागणी केली. नोकऱ्या गेल्याने या मुलामुलींकडे पैसे शिल्लक नाहीत. यातील अनेकजण भाड्याच्या खोलीत एकत्र राहतात. त्यांच्याकडे आता जेवणासाठी पैसे नाहीत. प्रवास करून संस्थेपर्यंत पोहचू शकत नाहीत, असेही अनेक जण आहेत. त्यामुळे सरकारने या मुलांना तातडीची मदत द्यावी. राज्यातील अनुरक्षणगृहात काही दिवस या तरुण-तरुणींच्या राहण्याची व्यवस्था करावी, तसेच त्यांच्यासाठी खानावळ सुरू करावी, अशी मागणी सनाथ संस्थेच्या गायत्री पाठक यांनी केली आहे.

 

उदरनिर्वाहाचा प्रश्न

या मुलांपैकी अनेकांसमोर दोन वेळचे जेवण मिळवणे हेच आयुष्याचे ध्येय बनले आहे. अनाथालयाचे छत्र सुटल्यानंतर अनेक मुले एकत्रित येऊन भाड्याच्या खोलीत राहतात. मात्र, रोजगारच नसल्याने भाडे भरण्याची ऐपत नसलेल्या तरुणांना नैराश्याने घेरले आहे. टाळेबंदीच्या काळात प्रचंड हाल झाले. आम्ही अनाथ आहोत. सरकारने या संकटकाळात मदत करावी, अशी याचना एका मुलीने केली.

आधार कुणाचा?

बालगृहाचा निवारा गेल्यानंतर ही मुले पुन्हा निराधार होतात. त्यातही धडपडत आणि संघर्षातून शिकत काहीजण आयुष्याचे सोने करतात, काम मिळवून पुढे जातात. मात्र, गेल्या वर्षभरापासून या मुलांना रोजगाराबरोबर निवाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यासाठी त्यांना सरकारच्या आधाराची गरज आहे.

कागदपत्रांअभावी  लाभापासून वंचित

बहुतांश मुलांकडे कोणतीच कागदपत्रे नसतात. तसेच राहण्यासाठी हक्काचे असे घर नसते. त्यामुळे रेशन कार्ड, अन्नधान्य मिळत नाही. टाळेबंदीत अनेकांचे रोजगार बुडाले. मात्र त्यांना सरकारकडून शिधा मिळाला नाही. तसेच कागदपत्रांअभावी इतर योजनांचाही लाभ घेता येत नाही. घरकुलसारख्या महत्त्वपूर्ण योजनेपासून आम्ही वंचित आहोत. त्यातच एखाद्या मुलाचा रोजगार गेल्यावर त्याला कोणताच आसरा नसतो, असे एकता निराधार संघाचे सागर रेड्डी यांनी सांगितले.