‘लाइफलाइन एक्स्प्रेसमुळे’ राज्यातील सुमारे ७० हजारांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवेचा फायदा

ऑपरेशन थिएटर म्हटले की उत्सुकतेपेक्षा भीतीच जास्त वाटते.. पण ही खोली कशी असते, इथे कोणती साधने असतात इथपासून ते एक्सरे, विविध वैदय़कीय चाचण्या करणारी यंत्रणा एका रेल्वेमध्ये कशी सामावली आहे, हे पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. देशभरात जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांमध्ये जाऊन मोफत वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या लाइफलाइन एक्स्प्रेस रेल्वेला मुंबईकरांनी भेट दिली.  मंगळवारी, ६ जून रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट क्रमांक दहावर नागरिकांना ही ट्रेन पाहता आली.

लाइफलाइन एक्स्प्रेस म्हणजे चालतेफिरते रुग्णालय. जिल्हा पातळीवर सर्वच वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतातच असे नाही. बऱ्याचदा रुग्णांना मुंबई, पुणे यांसारख्या मोठय़ा शहरांमध्ये उपचारांसाठी यावे लागते. तेव्हा या वैद्यकीय सुविधा मोफतपणे त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या रेल्वेच्या माध्यमातून गेल्या २८ वर्षांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार, पालघर, गोंदिया, चंद्रपूर, डहाणू या दुर्गम भागांसह इतर जिल्ह्य़ांमध्ये ७० हजारहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवेचा फायदा मिळाला आहे. सात डब्यांच्या या रेल्वेमध्ये हाडांच्या आजारासह डोळे, कान, नाक, अपस्मार आदीच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून प्लास्टिक सर्जरीदेखील केल्या जातात. यासोबतच अपंगांना विविध साधनेही या रेल्वेमधून पुरविण्यात येतात. दात आणि तोंडाच्या विकारांवरदेखील उपचार यामध्ये केले जातात. तसेच कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया रेल्वेमध्ये केल्या जातात, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले.

कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि गावागावांमध्ये अपुरी असलेली वैद्यकीय सुविधा लक्षात घेऊन २०१६ मध्ये या रेल्वेमध्ये कर्करोगाचे निदान आणि उपचार सुरू करण्यात आले आहेत. कर्करोगाचे निदान करणारी तंत्रप्रणाली रेल्वेमध्ये उपलब्ध असून आत्तापर्यंत सुमारे ४०० महिलांमध्ये स्तन आणि गर्भशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्यात आले आहे. तसेच २० हजारांहून अधिक कर्करोग रुग्णांना या माध्यमातून उपचार मिळाले असून २८ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

लाइफलाइन एक्स्प्रेस चौथ्यांदा मुंबईकरांच्या भेटीस आली असून बुधवारी ती लातूरला रवाना झाली आहे. लातूरमध्ये जवळपास एक महिनाभर या रेल्वेचा मुक्काम असणार असून तेथील गावागावांतील लोकांना यामुळे वैद्यकीय सुविधा जिल्ह्य़ाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, असे इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रजनीश गौर यांनी सांगितले.