जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित आशा पारेख यांच्या भावना

‘बिमलदा माझे मायबाप आहेत. त्यांच्यामुळेच मी सिनेसृष्टीत आले. नाहीतर डॉक्टर किंवा अन्य व्यवसायात असते’, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी आपल्या आठवणी जागवल्या. त्यांना ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ५२ व्या स्मृतीदिनानिमित्त ‘बिमल रॉय मेमोरियल फिल्म सोसायटी’कडून दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

हा सोहळा मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ट्रस्ट येथे पार पडला. आशा पारेख ८-९ वर्षांच्या असताना बिमल यांनी त्यांना अभिनय करण्याची पहिली संधी दिली होती. तसेच सुलोचना दीदींकडूनही त्यांना अभिनयाविषयी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे ‘बिमलदा आणि सुलोचनाबाई यांचे माझ्या आयुष्यात विशेष स्थान आहे’, असे म्हणत आशा पारेख यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात आशा पारेख आणि बिमल रॉय यांच्या चित्रपटातील गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले.

दिवंगत अभिनेते फारुख शेख यांनाही जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार त्यांची मुलगी शाईस्ताने स्वीकारला. यावेळी उपस्थित कलाकारांनी फारुख शेख यांच्या आठवणी जागवल्या.     अभिनेते परेश रावल, दिग्दर्शक, अभिनेते अनंत महादेवन, दिग्दर्शक अमित राय, अभिनेते जॅकी श्रॉफ यांना ‘बिमल रॉय स्मृती पुरस्कार’ देऊ न गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल, बिमल रॉय यांची कन्या रिंकी रॉय-भट्टाचार्य, अभिनेत्री सुलभा आर्या, डॉली बिंद्रा, पवन मल्होत्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे सिद्धार्थ यांनी केले.