डिसेंबर महिन्यात रंगसंमेलनात पुरस्काराचे वितरण

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ वस्तुसंग्रहालयतज्ज्ञ आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) माजी संचालक सदाशिव गोरक्षकर यांची निवड करण्यात आली आहे. तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्काराचे यंदा २६ वे वर्ष असून यंदाचा पुरस्कार ‘सांस्कृतिक’ क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे. वस्तुसंग्रहालय शास्त्रासारख्या सामान्यत: उपेक्षित ज्ञानशाखेमध्ये समर्पित भावनेने, ध्यासवृत्तीने आणि काळजीपूर्वक त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन यंदाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने एकमताने ही निवड केली. निवड समितीत विजय कुवळेकर, सुधीर जोगळेकर, डॉ. उदय निरगुडकर, सुधीर गाडगीळ, नामदेव कांबळे, नीला सत्यनारायण यांचा समावेश होता.

या पूर्वी ‘सांस्कृतिक’ क्षेत्रासाठीचा जीवनगौरव पुरस्कार भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, सत्यदेव दुबे, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. अशोक रानडे, श्री. पु. भागवत, आचार्य पार्वतीकुमार, भालचंद्र पेंढारकर, लता मंगेशकर, विजया मेहता, रत्नाकर मतकरी यांना प्रदान करण्यात आला होता. येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानच्या रंगसंमेलनात जीवनगौरव पुरस्कार गोरक्षकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.