News Flash

पाणीपुरवठय़ाच्या वेळेतील २० टक्के कपात मागे घ्या

मुंबईमध्ये सध्या अपुरा पाणीपुरवठा होत असून त्यामुळे पाणीपुरवठा वेळेत केलेली २० टक्के कपात मागे घ्यावी

सर्वपक्षीय नगरसेवकांची पालिकेकडे मागणी
मुंबईमध्ये सध्या अपुरा पाणीपुरवठा होत असून त्यामुळे पाणीपुरवठा वेळेत केलेली २० टक्के कपात मागे घ्यावी अशी मागणी नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही.
मुंबईत १५ टक्के पाण्यात आणि २० टक्के पाणीपुरवठय़ाच्या वेळेत कपात लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाण्याचा दाबही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची चणचण निर्माण झाल्याने २० टक्के पाणी कपात मागे घ्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल यांनी केली. घाटकोपरमधील काही विभागांमध्ये चार-चार दिवस पाणी मिळत नाही. नागरिक हैराण झाले आहेत, अशी माहिती काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी दिली.
पालिका पाण्याची गळती आणि चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे आजही गळती आणि चोरीमुळे मुंबईकरांचे तब्बल ७५० दशलक्ष लिटर पाणी हिरावले जात आहे. सध्या मोठय़ा प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होऊ लागला असून प्रशासन गंभीर नसल्यानेच असे प्रकार घडत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी यावेळी केला. पाण्याचा दाब कमी करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी यावेळी केला.
पाण्याची वेळ आणि पाणी यात कपात करण्यात आली आहे. पाण्याच्या दाबात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख नगरसेवकांना वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पाण्याचा दाब कमी केल्याने अनेकांना पाणी मिळत नाही, काही ठिकाणी गढून पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी गोंधळ घातला.

दूषित पाण्यावरून चौकशीची मागणी
गिरगावमधील फणसवाडीतील जगन्नाथ चाळी आणि आसपासच्या इमारतींना गेले चार महिने मलयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचे पडसाद स्थायी समितीत उमटले. सी विभाग कार्यालयातील जल विभागामधील निष्काळजी अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना मलयुक्त पाणीपुरवठा होत आहे. तब्बल चार महिने शोध घेऊनही दुषित पाणीपुरवठय़ाचा शोध अधिकाऱ्यांना लागला नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 7:02 am

Web Title: lift 20 percent water cut corporator demand
Next Stories
1 अपघातातील वाहनाचे ‘ऑडिट’ होणार!
2 डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येत रूद्र पाटीलचा सहभाग नाही?
3 ‘एफटीआयआय’चे आंदोलन का फसले?
Just Now!
X