मुंबई : उद्वाहन तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना बेस्ट, एसटी बस, रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी वाहनांमधून प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. कठोर निर्बंधांमुळे या कर्मचाऱ्यांना प्रवासास परवानगी नसल्याने अनेक ठिकाणी उद्वाहनांची दुरुस्ती रखडली होती. त्यामुळे लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे लक्षात घेत राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने त्यांना प्रवासास परवानगी दिली आहे. परंतु उपनगरीय रेल्वे प्रवासास परवानगी नसल्याने तंत्रज्ञांचा प्रश्न कायम आहे.

सध्या अनेक ठिकाणी उद्वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होत असून प्रवासबंदीमुळे तंत्रज्ञ तेथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. परिणामी, बहुमजली इमारतींमधील रहिवाशांना नाहक जिने चढ-उतार करण्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच रुग्णालयांतही उद्वाहनांच्या सेवेत अडथळे येत असल्याने रुग्णांना याचा त्रास होत आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने २३ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते.

आता शासनाने उद्वाहन देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या नोंदणीकृत परवानाधारक कंपन्याच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रवासास परवानगी दिली आहे. त्यानुसार या क र्मचाऱ्यांना बेस्ट आणि एसटी बसमधून प्रवास करण्यास परवानगी आहे. तसेच रिक्षा, टॅक्सी यांसह पोलिसांनी अडवू नये म्हणून खासगी वाहनासही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, रेल्वे प्रवासास परवानगी देण्यात आलेली नाही.  लोकल प्रवास कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या ठिकाणी जलद पोहोचता येते. तसेच प्रवासातील वेळ वाचल्याने कमी वेळात अधिक ठिकाणी सेवा देता येईल. म्हणून लोकल सेवेस परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे, असे उद्वाहन तंत्रज्ञांचे म्हणणे आहे.