उड्डाणपूल शहरात उतरवण्यास जागा नसल्याने नवीन उपाययोजनेचा प्रस्ताव
मध्य रेल्वेवर वक्तशीरपणामध्ये अडथळा ठरणारे दिवा स्थानकाजवळील रेल्वे फाटक बंद करण्यासाठी मध्य रेल्वेने ठाणे महापालिकेसमोर अनोखा पर्याय ठेवला आहे. या फाटकावर उड्डाणपूल बांधल्यास तो उतरवण्यासाठी दिवा शहरात अनधिकृत बांधकामांमुळे जागाच नाही. त्यामुळे रेल्वेच्या जागेत उड्डाणपूल बांधून दोन्ही बाजूंना २० टनांचे चार उद्वाहक बसवण्याचा पर्याय चर्चेत आहे. या उद्वाहकांमधून मोठे ट्रकही वर-खाली करू शकतील. त्यामुळे दिव्यातील रहिवाशांची आणि लाखो प्रवाशांची सोय होणार आहे.
दिवा स्थानकातील रेल्वे फाटकामुळे मध्य रेल्वेच्या ५० सेवांना दर दिवशी फटका बसतो. हे फाटक ठरावीक काळापेक्षा जास्त उघडे राहिल्यास किमान दोन गाडय़ा जागच्या जागी उभ्या राहतात. त्यामुळे ते बंद करण्यासाठी रेल्वे आग्रही आहे. मात्र या फाटकावर उड्डाणपूल बांधल्यास तो दिवा शहरात दोन्ही बाजूंनी उतरवण्यासाठी जागा नाही. येथे दोन्ही बाजूंना अनधिकृत इमारती असून अनेक दबावगटांमुळे त्या पाडणे ठाणे महापालिकेला शक्य नाही. त्यामुळे या उड्डाणपुलाचे घोंगडे भिजत पडले आहे.
यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने पालिकेसमोर उद्वाहकाचा पर्याय ठेवला आहे. रेल्वे आपल्या हद्दीतील सर्व मार्गिकांवर उड्डाणपूल उभारण्यास तयार आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या दोन्ही टोकांना दोन-दोन उद्वाहक उभे करता येतील. या उद्वाहकांद्वारे अवजड वाहनांपासून हलक्या वाहनांपर्यंत विविध प्रकारची वाहने वर-खाली घेऊन जाता येतील. त्यामुळे गाडय़ा एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अशा पद्धतीने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना उद्वाहक ठेवून वाहतूक करण्याचे तंत्रज्ञान जगभरात सर्रास वापरले जाते. हे उद्वाहक ५० टनांचेही असू शकतात. त्यामुळे अतिअवजड गाडय़ाही त्यात बसू शकतात. तसेच हे उद्वाहक दोन्ही बाजूंनी उघडत असल्याने वाहन आत गेल्यावर समोरच्या बाजूने बाहेर येऊ शकेल. दिवा येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारणे शक्य नसल्यास हा एकच पर्याय शिल्लक राहत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. याबाबत ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.